रामगड परिसरातील घटना : जामीन घेण्यावरून उद्भवला वाद कामठी : चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या मित्राचा जामीन घेण्यावरून वाद निर्माण झाला. त्यातच एकाने जामीन घेण्यास नकार दिल्याने तिघांनी एकास लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच त्याच्यावर चाकूने वारही करण्यात आले. यात गंभीर जखमी झालेल्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कामठी (नवीन) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगड परिसरात रविवारी रात्री घडली असून, जखमीचा मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला. यात तिघांना अटक करण्यात आली. संतोष गोविंद आमधरे (४१, रा. रामगड, कामठी) असे मृताचे नाव असून, अनुराग किसन भगत (२९), उमेश मंगल जगणे (२७) दोघेही रा. रामगड, कामठी व रोहित बुधाजी गजभिये (२६, रा. बुद्धनगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, हे चौघेही मित्र होत. या चौघांनी रविवारी (दि. १०) रात्री रामगड परिसरात ओली पार्टी केली. त्यांच्या एका मित्राला मौदा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याने तिघांनी संतोषकडे त्याचा जामीन घेण्याचा प्रस्ताव ठेवला. संतोषने जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद उद्भवला. रात्री ११ वाजताच्या सुमारास संतोष घरी गेल्यानंतर तिघेही त्याच्या घरी गेले. त्यांनी संतोषसोबत याच कारणावरून वाद घालत त्याला लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे संतोषची पत्नी नंदा, मुलगी व त्याच्याकडे किरायाने राहणारे दोघे भांडण सोडविण्यासाठी गेले. तिघांनी त्यांनाही मारहाण केली. त्यातच संतोषवर चाकूने वार करण्यात आले. यात संतोष गंभीर जखमी झाल्याने तिघेही पळून गेले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी संतोषला लगेच कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. दरम्यान, मध्यस्थी करणाऱ्या चौघांना मेयो रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, संतोष मंगळवारी (दि. १२) सकाळी मेयो रुग्णालयातून कुणालाही न सांगता निघून गेला. भोले पेट्रोलपंपजवळ नागरिकांवर दगडफेक केल्याने बर्डी पोलिसांनी अटक करून मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यानंतर त्याला मनोरुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे प्रकृती खालावल्याने परत मेडिकलमध्ये भरती केले.मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी संतोष नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी सुरुवातीला भादंवि ३२४, ५०६, ३४ आणि नंतर ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली. (तालुका प्रतिनिधी)
तिघांनी केली मित्राची हत्या
By admin | Updated: July 16, 2016 03:05 IST