खापरखेडा : अवैधरीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना खापरखेडा पोलिसांनी दहेगाव (रंगारी) येथे अटक केली. त्यांच्याकडून पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ज्ञानेश्वर हरिराम देव्हारे (२४, रा. गोंडेगाव, टेकाडी, ता. पारशिवनी), राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम भोयर (२८, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) व मोरेश्वर मधुकर मोगरे (२८, रा. सोनबानगर, वाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहेगाव (रंगारी) परिसरातून कोलार नदी वाहते. हे तिघेही कोलार नदीच्या परिसरात मंगळवारी सकाळी फिरत होते. दरम्यान, किशोर चौधरी रा. दहेगाव (रंगारी) यांना संशय आल्याने त्यांनी लगेच या तरुणांची माहिती खापरखेडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यात त्यांच्याजवळ पिस्तूल व ७.६३ मि.मी.चे पाच जिवंत काडतुसे असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पिस्तूल व काडतूस जप्त करून तिघांनाही अटक करण्यात आली. पिस्तूल व काडतुसांची किंमत ३० हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींकडून आणखी काही शस्त्रांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटकेतील आरोपी कामठी येथील एका व्यक्तीसाठी काम करीत असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, मुंबई पोलीस कायदा सहकलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, लक्ष्मीप्रसाद दुबे, बंडू कोकाटे, पंकज गुप्ता, अमित यादव, रवी मेश्राम, लक्ष्मीकांत रुडे आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)
पिस्तूलसह तिघांना अटक
By admin | Updated: April 29, 2015 02:47 IST