नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे हृदयस्थळ अन् राज्याची उपराजधानी असलेले नागपूर आर्थिक घोटाळ्याचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गेल्या १० वर्षात नागपुरात ५० पेक्षा जास्त आर्थिक घोटाळे उघड झाले. त्यातील नऊ मोठे आर्थिक घोटाळ्यांनी सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.
दरवर्षी कोणता न कोणता मोठा आर्थिक घोटाळा उजेडात येतो. गेल्या १० वर्षांत ठिकठिकाणचे ठगबाज आणि त्यांच्या कंपन्यांनी नागपूरच नव्हे तर देशातील हजारो गुंतवणूकदारांना साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्त रुपयाचा गंडा घातला आहे. या आर्थिक घोटाळ्यांना कधी लगाम बसणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२०१० मध्ये महादेव लॅण्ड डेव्हलपर्सचा संचालक प्रमोद अग्रवाल याने आर्थिक घोटाळ्याची सुरुवात केली. त्याने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवीत हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे १५० कोटी रुपये गिळंकृत केले होते. नंतर एकामागे एक घोटाळ्याची मालिकाच सुरू झाली.
२०११ - वर्षा आणि जयंत झामरे या ठगबाज दाम्पत्याने नागपूरकरांचे २०० कोटी रुपये हडपले.
२०१२ - १३ - हरिभाऊ मंचलवार नावाचा ठग गुंतवणूकदारांचे सुमारे १५० कोटी रुपये घेऊन पळून गेला.
२०१३ - समीर जोशीच्या श्रीसूर्या समूहाने हजारो गुंतवणूकदारांचे सुमारे ७०० कोटी रुपये हडपले.
२०१३ - देवनगर चौकातील साथीदार राजेश जोशी यानेही ठेवीदारांचे सुमारे २०० कोटी रुपये गिळंकृत केले.
२०१४ - वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाने प्रशांत वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांनी हजारो गुंतवणूकदारांचे १५०० कोटी रुपये हडपले.
२०२० - श्रीराम अर्बन सोसायटी ८६ कोटी, विश्वकर्मा पतसंस्थेत २० कोटींचे घोटाळे
२०२० - महाठग विजय गुरनुलेच्या रिअल ट्रेड आणि मेट्रो व्हिजन कंपनीने देशभरातील १५ हजारापेक्षा जास्त गुंतवणूकदारांना २०० कोटीचा गंडा घातला.
---
दोन वर्षांत ३३ घोटाळे दाखल
विशेष म्हणजे, दोन वर्षांत नागपुरात श्रीराम अर्बन, विश्वकर्मा पतसंस्था आणि रिअल ट्रेड मेट्रो व्हिजनच्या घोटाळ्यासह एकूण ३३ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. येथील आर्थिक गुन्हे शाखेने त्यातील २१ गुन्ह्यांचा सखोल तपास करून कोर्टात दोषारोपपत्र सादर केले आहे. अलीकडच्या १२ गुन्ह्यांचा तपास प्रगतिपथावर असून लवकरच त्यांचीही चार्जशीट कोर्टात पाठविली जाणार आहे.
----