नागपूर : दीड किलो गांजा बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थविरोधी कायद्याचे विशेष न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने एका आरोपीस सहा महिने सहा दिवस सश्रम कारावास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शेख चांद शेख इस्माईल (४५) रा. राहुल गांधीनगर चिखली झोपडपट्टी, असे आरोपीचे नाव आहे. प्रकरण असे की, शहर गुन्हे शाखेचे पथक चिखली झोपडपट्टी भागात पेट्रोलिंग करीत असताना शेख चांद हा त्यांना गांजा घेऊन जाताना आढळला होता. लागलीच त्याला अटक करून त्याच्याजवळून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलम २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल जॉन सॅम्युएल यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंद्रे तर आरोपीच्या वतीने अॅड. सुदामे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल फय्याज खान यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
गांजा बाळगणाऱ्यास सहा महिने कारावास
By admin | Updated: May 30, 2015 02:57 IST