सोमेश्वर नैताम लाच प्रकरण : विधान परिषदेत प्रश्न उपस्थितनागपूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोमेश्वर नैताम यांनी अनेक शाळांना फायदा मिळवून दिला होता. ज्या शाळांच्या प्रकरणात अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले होते, त्यांच्या सुनावणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नैताम यांच्या लाच प्रकरणासंदर्भात विधान परिषदेत नागो गाणार व अनिल सोले यांच्याकडून तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात शासनाकडून आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.२९ मार्च रोजी नैताम यांच्या निवासस्थानाची ‘अॅन्टी करप्शन ब्युरो’तर्फे झडती घेण्यात आली होती. त्यानंतर नैताम यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात दिलेल्या निर्णयाची तपासणी करण्यासाठी विभागीय उपसंचालकांनी तपासणी पथक नेमले होते. ज्या प्रकरणांत अनियमितता निदर्शनास आली त्यांची सखोल चौकशी करण्याची शिफारस या पथकाने केली होती. या पथकाच्या अहवालाच्या शिफारशीनुसार २० प्रकरणांत नैताम यांनी शिक्षणाधिकारी म्हणून घेतलेल्या निर्णयास स्थगिती देण्यात आली. शिवाय संबंधित शाळांची पूर्ण चौकशी होईपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले होते. शिवाय ८ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार अनियमितता आढळून आलेल्या शाळांची शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सुनावणीदेखील घेतली, असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ शाळांचे अहवाल सादर करणार
By admin | Updated: December 10, 2014 00:40 IST