लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या १५ दिवसात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात यावा, असे आदेश राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. बार्टी पुणे येथे समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक उपायुक्त समवेत शुक्रवारी राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी त्यांनी उपराेक्त आदेश दिले.
समाजातील सर्वच घटकांना कोरोनाचा फटका बसला असून ज्येष्ठ नागरिकांचे देखील अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत, त्यांच्या सर्व अडीअडचणीचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे डॉ. नारनवरे यांनी यावेळी सूचित केले.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या राज्यस्तरीय आढावा बैठकीप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने विविध योजनांची करण्यात येत असलेल्या मार्गदर्शिके बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करणेबाबत देखील यावेळी सविस्तर चर्चा करण्यात येऊन कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके, सहआयुक्त भारत केंद्रे ,सहआयुक्त वृषाली शिंदे, उपायुक्त प्रशांत चव्हाण, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, तसेच आयुक्तालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.