आदिवासी विद्यार्थ्यांचा हल्लाबोल : अप्पर आयुक्त कार्यालयाला घेराव नागपूर : कळमना येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पिण्यासाठी, वापरासाठी पाणीच नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. वेळोवेळी प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्तांना पाण्यासाठी निवदनेही देण्यात आली. परंतु पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे गुरुवारी विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयाच्या गेटला कुलूप लावून जोरदार निदर्शने केली. दिवसभर हे विद्यार्थी पाण्यासाठी कार्यालय परिसरात ठिय्या देऊन बसले होते. कळमना येथे १००० आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहापैकी ‘एलएन’ या वसतिगृहात २६० विद्यार्थी आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या वसतिगृहात पाणी नाही. पाणी पुरवठ्यासाठी वसतिगृहात एक बोअरवेल आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बोअरवेलही बंद पडली आहे. प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र हा अनियमित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात असलेल्या मंगल कार्यालयातून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. टँकरवर प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहे. परंतु पाण्याचा स्वतंत्र स्रोत निर्माण करता आला नाही. प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून, वेळोवेळी प्रशासनाला कळवूनही कुठल्याच उपाययोजना होत नसल्याने विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. जोरदार निदर्शने केली. कार्यालयाचे गेट लावून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. शेवटी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे दिनेश शेराम, वसतिगृहातील विद्यार्थी विलास नैताम, नीलेश ठाकरे, सोनम बागडेरिया, विनोद वट्टी, दिनेश कोटंगी, योगेश कुडव, सागर सोळंके, दीपक येडमे, किशोर उईके सहभागी होते. (प्रतिनिधी)
वसतिगृहात पाणीच नाही
By admin | Updated: August 19, 2016 02:29 IST