रुता दुरगुले : नागपूरचे सावजी भोजन खासनागपूर : लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान प्रस्तुत ‘धमाल दांडिया’च्या अंतिम फेरीसाठी नागपुरात आलेली स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ मालिकेची मुख्य अभिनेत्री रुता दुरगुले हिने मंगळवारी माध्यमांशी दिलखुलास गप्पा मारल्या. दुर्वा मालिकेनंतर अनेक मराठी चित्रपट व मालिकांची आॅफर मिळाली. ती करायची इच्छाही आहे. मात्र एकाच प्रोजेक्टवर चांगले काम करायचे हे महत्त्वाचे वाटत असल्याने दुर्वा पूर्ण होईपर्यंत दुसरी मालिका स्वीकारणार नाही, अशी कबुली रुता दुरगुले हिने यावेळी दिली.मुंबईच्या महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला असताना अनवधानाने मराठी मालिकेच्या आॅडिशनसाठी गेले. तेथेच रसिका देवधर यांच्याशी भेट झाली व दुर्वा मालिकेसाठी माझी निवड झाली. शिक्षण आणि मालिका असा समन्वय साधण्याचा विश्वास दिल्यानंतर घरच्यांनीही परवानगी दिली आणि माझा मालिकेचा प्रवास सुरू झाला. या मालिकेत विनय आपटे, शरद पोंक्षे, प्रसाद पंडित यांच्यासारखे दिग्गज कलावंत काम करीत असल्याने ही सुवर्णसंधी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, अशी प्रांजळ कबुली रुताने दिली. दुर्वा मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे व मालिकेत आपली मुख्य भूमिका आहे याचा अतिशय आनंद असल्याचे ती म्हणाली. लवकरच ही मालिका ९०० एपिसोड पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले. दुर्वा ही राजकीय कुटुंबातील कथा आहे. सुरुवातीला माझी भूमिका कॉलेज गोर्इंग मुलीची होती. त्यामुळे ते सोप गेलं. मात्र त्यानंतर भूमिकेला राजकीय वळण मिळाले. राजकारणाचा फारसा गंध नसल्याने मलाही याबाबत अभ्यास करावा लागल्याचे तिने सांगितले. समाजकार्याची आवड आहे, मात्र राजकारणात येण्याचा कुठलाही विचार नसल्याचे ती म्हणाली. नागपुरात पहिल्यांदा आली आहे. येथील सावजी व संत्रा बर्फीबाबत फार ऐकून होते. त्यामुळे आल्याबरोबर सावजी भोजनावर ताव मारल्याचे तिने सांगितले; शिवाय सेटवरच्या बऱ्याच लोकांनी संत्राबर्फी आणण्याचे सांगितले होते. त्यामुळे संत्राबर्फीही विकत घेतल्याचे तिने यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)धमाल दांडियाबाबत एक्साईटेडदांडिया हा आधीपासूनच आवडता विषय आहे. मात्र एक सेलिब्रिटी म्हणून मी पहिल्यांदा सहभागी झाली आहे. रणवीरसिंह सोबत असल्याने लोकमतच्या धमाल दांडियाबाबत खूप एक्साईटेड असल्याची भावना रुता दुरगुले हिने व्यक्त केली.
‘दुर्वा’ पूर्ण होईपर्यंत दुसरी मालिका नाही
By admin | Updated: December 2, 2015 03:25 IST