मध्यवर्ती कारागृहात पूर्णवेळ मनोविकृतीतज्ज्ञ नाही : कैद्यांचे समुपदेशन होणार कसे?योगेश पांडे नागपूरमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला ३० जुलै रोजी फाशीची शिक्षा देण्यासाठी तुरुंग प्रशासनाकडून युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. याकूब बाहेरून शांत वाटत असला तरी मानसिक नैराश्याचा त्याचा इतिहास पाहता प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी होण्यापर्यंतच्या काळात याकूबच्या मन:स्थितीचे नियमित परीक्षण होणे आवश्यक आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पूर्णवेळ मनोविकृतीतज्ज्ञच उपलब्ध नाही. ‘व्हिजिटिंग’ मनोविकृतीतज्ज्ञांच्या भरवशावर याकूबचे मानसिक संतुलन ढळू न देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु यामुळे इतर कैद्यांचे किती प्रमाणात समुपदेशन होऊ शकत असेल असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.१९९४ साली अटक करण्यात झाल्यानंतर याकूबला मानसिक आजार झाला होता. नागपूर कारागृहात त्याची रवानगी करण्यात आल्यानंतर त्याचे मनोविकारतज्ज्ञ व मानसशास्त्रज्ञांकडून नियमितपणे समुपदेशन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवल्यावर तो प्रचंड मानसिक नैराश्यात गेला होता. परंतु मानसोपचारतज्ज्ञांमुळेच तो त्यातून बाहेर आला होता. एरवी याकूब शांत असला व केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झालेला नसला तरी ‘क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळण्यात आल्यापासून तो काहीसा अस्वस्थ झाला आहे. अशा स्थितीत त्याची नियमितपणे मानसिक पातळीवरदेखील तपासणी होणे आवश्यक आहे. शिवाय या काळात त्याच्या बदलत्या मानसिकतेची योग्य नोंद झाली पाहिजे. याचा फाशीच्या कैद्यांवर होत असलेल्या संशोधनासाठी मौलिक उपयोग होऊ शकतो. आजच्या तारखेत ‘व्हिजिटिंग’ मनोविकारतज्ज्ञांवर कारागृह प्रशासनाला अवलंबून राहावे लागत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
याकूबच्या मन:स्थितीचे परीक्षणच नाही
By admin | Updated: July 24, 2015 02:49 IST