नागपूर : अखिल भारतीय नाट्य संमेलनात देशभरातून आलेल्या तमाम मराठी नाट्यप्रेमींसमोर आपले सादरीकरण करून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी कलावंत धडपडत असतात. यंदा कधी नव्हे ते चार पदाधिकारी मध्यवर्तीत आहेत. पण बेळगाव येथे होणाऱ्या नाट्य संमेलनात नागपूरकर कलावंतांना प्रतिनिधित्व देण्यात चारही पदाधिकारी कमी पडले. कमी पडले नव्हे तर यासाठी नागपूरच्या कलावंतांच्या सादरीकरणाचा प्रस्तावही देण्यात आला नाही, त्यामुळे नागपूरचा विचारही करण्यात आला नाही. बेळगाव येथे होणाऱ्या या नाट्य संमेलनासाठी उत्साहाचे वातावरण होते. पण नागपूरकरांना संधीच न मिळाल्याने कलावंतांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. साधारणत: दरवर्षीच यासंदर्भात नाट्य परिषदेत सुंदोपसुंदी होते. कुणी तरी एखादा सदस्य नागपूरच्या सादरीकरणाचा प्रस्ताव खाजगीस्तरावर ठेवतो, त्यातील काहींना संधी मिळते. त्यानंतर श्रेय घेण्यासाठी सारेच समोर येतात आणि त्यातून वाद-प्रवादांच्या फैरी झडत राहतात. कदाचित एखाद्या संस्थेत असणारी मतभिन्नता समजून घेता येणे शक्य आहे. पण या वादात प्रादेशिक नुकसान होत असेल तर विचार करणे गरजेचे आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळेही नागपूरचे प्रतिनिधित्व या संमेलनात असावे, असे कलावंतांना वाटत असताना अंतर्गत वादात नागपूर शाखेने प्रस्तावही न पाठविणे दुर्दैवी असल्याचे मत कलावंतांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नागपुरातील चार पदाधिकारी मध्यवर्तीत असण्याचा लाभ नागपूरच्या कलावंतांना झाला नाही. गेल्या वर्षीपासून नागपुरात नाट्य संमेलन आयोजित करण्याच्या विचाराने उचल खाल्ली होती. यंदा त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी भाबडीच आशा अनेकांना होती. पण तूर्तास नाागपुरात नाट्य संमेलन आयोजित करण्याची कल्पनाही कुणी करीत नसल्याचे चित्र आहे. त्यात यंदा बेळगावचे पारडे जड पडले. नागपुरात नाट्य संमेलन आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांनीही हात आखूडता घेतला आहे. त्यात उपराजधानीचे प्रतिनिधित्वही अ.भा. नाट्य संमेलनात नसणे हे रंगकर्र्मींच्या जिव्हारी लागले आहे. विविध प्रदेशातील पदाधिकारी अ.भा. कार्यकारिणीत निवडण्यामागे प्रादेशिक समतोल साधण्याचा उद्देश असताना नागपूरचे चार पदाधिकारी मिळून नागपूरसाठी काहीही करू शकले नाही, या विषयावर नाट्य क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. (प्रतिनिधी)
नाट्य संमेलनासाठी नागपूर शाखेचा प्रस्तावच नाही
By admin | Updated: February 4, 2015 00:52 IST