लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते अपघातांची स्थिती नागपुरात चिंताजनक असून अपघात झाल्यानंतर मनपा, नासुप्र व वाहतूक पोलीस विभाग अपघात का झाला, याचा अभ्यास करीत नाहीत. उपाययोजनाही केल्या जात नाही. या तीनही विभागांत सहकार्य, समन्वय आणि संवाद दिसत नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
‘इंटेलिजंट सोल्युशन फॉर रोड सेफ्टी’ या विषयावरील एका संवादात गडकरी बोलत होते. यावेळी मनपाचे अप्पर आयुक्त मीना, सतीशचंद्रा, निवृत्ती राय, खा. डॉ. विकास महात्मे, प्रो. नारायण आदी मान्यवर उपस्थित होते. जगात रस्ते बांधकामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, नुकतेच बांधकामात प्राधिकरणाने ३ जागतिक विक्रम केले आहेत. ३८ किमी प्रतिदिन याप्रमाणे आमचे रस्ते, महामार्ग बांधण्याची गती आहे. नुकतीच आम्ही ‘रोड कम एअरस्ट्रीप’ राजस्थानात तयार केली असून नुकतेच त्याचे उद्घाटन झाले. अशा आणखी २० एअरस्ट्रीप बनवीत आहोत. रस्त्यांच्या शेजारी ४५० हेलिपॅड तयार करीत आहोत. अपघातामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत हे हेलिपॅड जीव वाचविण्यासाठी मदत करतील.
रस्त्यावरील कार पार्किंग अपघाताचे कारण
- रस्ते अपघातासाठी रस्त्यावर होणाऱ्या कारचे पार्किंग हे एक कारण असते. यावर उपाय म्हणून रस्त्यावर पार्किंग केलेल्या कारचे फोटो काढण्याचे काम जनआक्रोशसारख्या स्वयंसेवी संस्थांना दिले गेले पाहिजे व अशा कारवर कारवाई व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
अपघातातील ७० टक्के मृतक तरुण
- देशात दरवर्षी ५ लाख अपघात होतात व १.५ लाख लोक मृत्युमुखी पडतात. यापैकी ७० टक्के मृत हे १८ ते ४० वयोगटातील तरुण असल्याचे समोर आले आहे. नागपुरात १५०० अपघातात २५० जणांचा मृत्यू होतो. वाहन सुरक्षा पैलू ठरविताना व्हीएनआयटीची मदत घेतली जावी. ड्रायव्हर वॉर्निंग सिस्टमही अपघात कमी करण्यास मदत करते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.