नागपूर : स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसने देशाला एकसंघ केले. ब्रिटिशांविरोधात लढा दिला. सद्यस्थितीत ब्रिटिशांची जागा भाजपने घेतली आहे. आपली सत्ता जाऊच शकत नाही, असा त्यांचा भ्रम झाला आहे. शेतकरी, कामगार विरोधी कायदे करून सामान्यांची गळचेपी सुरू आहे. काँग्रेस नेहमी अन्यायाविरोधात लढत आली आहे. आता अन्याय करणाऱ्या भाजप विरोधात ताकदीने लढायचे आहे, असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.
नागपुरात २६ डिसेंबर १९२० रोजी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी स्मरण सोहळा शहर काँग्रेस समितीतर्फे देवडिया काँग्रेस भवनात शनिवारी आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार होते.
यावेळी पालकमंत्री राऊत म्हणाले, वंजारी यांच्या निवडणुकीत काँग्रेसजनांनी एकी दाखविली. तीच एकी महापालिकेच्या निवडणुकीत दाखवू. मी पालकमंत्री म्हणून शहर अध्यक्षांना सोबत घेऊन विधानसभानिहाय बैठका घेईल व त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घेईल, असे राऊत यांनी जाहीर केले. सुनील केदार म्हणाले, काँग्रेसच्या हातात अजूनही ताकद आहे. याच नागपूर विदर्भाने इंदिराजींना ताकद दिली होती. पुन्हा आत्मविश्वास जागा करीत पक्षाला तीच ताकद देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अंबानी- अदानींच्या वस्तूंवर बहिष्काराचा ठराव
- अंबानी व अदानी यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंवर प्रत्येक काँग्रेसने बहिष्कार घालावा, असा ठराव या सोहळ्यात एकमताने मंजूर करण्यात आला. प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा प्रस्ताव मांडला. तर विशाल मुत्तेमवार यांनी अनुमोदन दिले. तसेच भाजपकडून देश लुटण्याची कृती सुरू असून देशाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू आहे. याचा विरोध करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. किशोर गजभिये यांनी संबंधित ठराव मांडला व गजराज हटेवार यांनी अनुमोदन दिले.