लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. यावेळी त्याने मुंबई बॉम्बस्फोटातील दोन दहशतवादी, एक नक्षलवादी आणि एका तुरुंग रक्षकासह नऊ जणांना विळखा घातला आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आजच्या घडीला २२०० वर कैदी आहेत. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत यातील कैद्यांपैकी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह २२ जणांना कोरोनाची बाधा झाली होती आणि ते सर्वच्या सर्व बरेही झाले होते. आता गुरुवारपासून पुन्हा काही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. शुक्रवारी त्यातील एका कैद्याला मेडिकलमध्ये नेले असता, तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला मेडिकलमध्येच दाखल करण्यात आले. शनिवारी रात्रीपासून पुन्हा आठ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे तीव्रतेने दिसून आली. या सर्वांना रविवारी दुपारी तपासणीसाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. सर्वांचे सीटी स्कॅन करून घेण्यात आले. त्यातून एका तुरुंग अधिकाऱ्यासह आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कारागृह अधीक्षक अनूपकुमार कुमरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी एक कैदी मेडिकलमध्ये भरती करण्यात आला, तर आज कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यामुळे एका तुरुंग रक्षकाला गृहविलगीकरण करण्यात आले. अन्य सात जणांवर कारागृहातील इस्पितळात उपचार करायचे ठरल्यामुळे त्यांना परत आणण्यात आले.
---
यांना झाली बाधा
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, दहशतवादी नावेद हुसेन राशीद खान, फिरोज अब्दुल राशीद खान, नक्षलवादी पवन ऊर्फ सोमा वेलादी, अट्टल गुन्हेगार वसंता संपत दुपारे तसेच अनूप अण्णाजी भोसले, सनी चव्हाण, लोकेश लाडे, कमाल अंसारी आणि तुरुंगाधिकारी आडे.
----
तीन फाशीचे कैदी
बाधा झालेल्यांपैकी दहशतवादी नावेद आणि राशीद तसेच क्रूर गुन्हेगार म्हणून दुपारे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे तिघे फाशी यार्डात असतात. वेलादी नक्षली आहे, तर भोसले मकोकाचा आणि चव्हाण एमपीडीएचा आरोपी आहे.
----