लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होईल.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असून, विद्यार्थ्यांनी याच वेळापत्रकाचा आधार घ्यावा. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा व महाविद्यालयांना कळविले जाईल, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. दहावी व बारावीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत काही हरकती, सूचना असल्यास त्या राज्य अथवा विभागीय मंडळाकडे २२ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.