उमेदवाराबाबत मतदारांनाच विचारणा : सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ सर्वेक्षण
योगेश पांडे, ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १२ - : मागील ५ वर्षात विविध राजकीय पक्षांच्या कार्यप्रणालीत मोठा बदल झाला आहे. तंत्रज्ञानावर सर्वच पक्षांचा मोठा भर असून एरवी प्रचारात मोठी भुमिका पार पाडणाºया ‘सोशल मिडीया’चा निवडणूकांसाठी उमेदवार शोधण्यासाठीदेखील उपयोग करण्यात येत आहे. नागपुरात सध्या एक ‘आॅनलाईन’ सर्वेक्षण होत असून या माध्यमातून मतदारांना कोणता उमेदवार सक्षम वाढतो याची चाचपणी होत आहे. यामागे नेमका कुठला राजकीय पक्ष आहे, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूकांचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांच्या उमेदवारी यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती संपल्या आहेत तर भाजपाच्या प्रभागनिहाय मुलाखती सुरू आहेत. शिवसेना, बसपा, राष्ट्रवादी या पक्षांमध्येदेखील उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. कुठल्याही पक्षाने अद्याप उमेदवार अंतिम केलेले नाहीत.
यंदाची निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे तर कॉंग्रेससाठी अस्तित्व सिद्ध करण्याची आहे. सर्वच पक्षांमध्ये तिकीटासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. भाजपातर्फे सर्व प्रभागांत सर्वेक्षणदेखील करण्यात आले होते व सक्षम उमेदवारांच्या नावांची यादी तयार करण्यात आली होती. दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनीदेखील प्रभागस्तरावर मेळावे घेऊन उमेदवारांची चाचपणी केली होती.
मात्र आता प्रत्यक्ष मतदारांना कुठला उमेदवार हवा आहे, याबाबतच थेट विचारणा करण्यात येत आहे. यासंदर्भात शहरात ‘स्पायपोल’ या नावाने सर्वेक्षण सुरू असून थेट मतदारांच्या ‘व्हॉट्सअॅप’ किंवा ‘सोशल मिडीया अकाऊंट’वर याची ‘लिंक’ शेअर करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण नेमके कोण करत आहे, यामागे नेमका विचार कुणाचा आहे, याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली आहे.
संबंधित ‘लिंक’ उघडल्यानंतर शहरातील सर्व प्रभागांची यादी उघडते. त्यानंतर मतदारांना त्यांचा दुरध्वनी क्रमांक नोंदविण्याची सूचना येते. त्यानंतर व्यक्तीची माहिती विचारण्यात येते. आवश्यक त्या ठिकाणी ‘क्लिक’ केल्यानंतर सर्व मोठ्या पक्षातील उमेदवारांची नावे येतात. कुठल्याही २ उमेदवारांच्या नावासमोर ‘क्लिक’ करण्याची सूचना येते. मतदान पक्षाला पाहून करणार की उमेदवारांना याचीदेखील विचारणा करण्यात येत आहे.