रामटेक : राज्यात आदर्श समजल्या जाणाऱ्या नवरगाव (ता. रामटेक) ग्रामपंचायत कार्यलयाच्या परिसरात असलेली सागवानाची दाेन झाडे परस्पर ताेडण्यात आली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे खुंटही मुळासकट साफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य अमर वंजारी व नागरिकांनी वन, महसूल, पाेलीस व पंचायत विभागाकडे लेखी तक्रार केली असून, या गंभीर प्रकाराकडे या विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
या ग्रामपंचायतच्या परिसरात सागवानासह इतर झाडांची लागवड करण्यात आली आहे. यातील सागवानाची दाेन झाडे ताेडण्यात आल्याची तसेच त्यांचे खुंट साफ करण्यात आल्याची बाब अमर वंजारी, जागेंद्र शिराेडे यांच्या लक्षात आली. त्यांच्यासह ग्रामस्थांनी याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार व खंडविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खुंटांची पाहणी केली. ही झाडे नेमकी कुणी, कधी व कशासाठी ताेडली याबाबत त्यांची प्रभावी चाैकशी केली नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
याबाबत मुख्य संरक्षक कल्याणकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांच्यासह लाेकायुक्तांकडे तक्रार केली असल्याचेही नागरिकांनी सांगितले. ही कुणी व कधी ताेडली, त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावण्यात आली, याबाबत गावात चर्चा असूनही संबंधितांनी त्या दिशेने तपास केला नसल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. दुसरीकडे या प्रकरणाची निरपेक्ष चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
.....
ग्रामपंचायतची वैशिष्ट्ये
नवरगाव ग्रामपंचायत १९९० च्या दशकात राज्यात चर्चेत हाेती. या ग्रामपंचायतचे कार्यालय टुमदार व सुंदर आहे. येथे स्वतंत्र सभागृह असून, परिसरात खुला रंगमंच आहे. या गावाने विविध शासकीय उपक्रम सामूहिककरीत्या यशस्वीपणे राबविल्याने ते राज्यात प्रथम क्रमांकाचे आदर्श गाव ठरले हाेते. यासह अन्य बाबी या ग्रामपंचायतची वैशिष्ट्ये ठरली आहेत.