यशोधरा ठाण्यावर जप्तीची नोटीस : ७० वर घर व भूखंडही जप्त नागपूर : जानेवारी संपला. मार्च तोंडावर आहे. कर विभागाने उत्पन्नाचे ५० टक्केही लक्ष्य गाठलेले नाही. वसुलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर विभागावर दबाव वाढविला जात आहे. या सर्व प्रकारामुळे आता कर विभागातील कर्मचारी चांगलेत संतापले असून त्यांनी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दररोज दहाही झोन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून घरांना सील ठोकले जात आहे. भूखंड जप्त केले जात आहेत. शनिवारी तर आशीनगर झोनने यशोधरा पोलीस ठाण्यावर जप्तीची नोटीस लावली. दिवसभरात सर्व झोनने सत्तरावर घर व भूखंड जप्त करण्याची कारवाई केली. यशोधरा ठाण्याने २००६ पासून कर भरला नाही गुन्हेगारांचा शोध घेण्यात व्यस्त राहणारे यशोधरा पोलीस ठाणे मालमत्ता कर भरणे विसरले. २००६ पासून संबंधित ठाण्याने मालमत्ता कर भरलाच नाही. परिणामी शनिवारी आशीनगर झोनने ठाण्यावर जप्तीची नोटीस लावली. संबंधित पोलीस ठाणे भाड्याच्या इमारतीत आहे. संबंधित जमीन नासुप्र व अब्दुल गफ्फार अब्दुल कादीर यांच्याकडून लीजवर घेण्यात आली आहे. या इमारतीवरील मालमत्ता कर नियमानुसार पोलीस ठाण्याला भरायचा होता. मात्र, २००६ पासून पोलीस ठाण्याने कर भरलाच नाही. मार्च तोंडावर आहे. कर विभागातील कर्मचाऱ्यांना वसुलीचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे आशीनगर झोनच्या कर्मचाऱ्यांनी शेवटी कर वसुलीसाठी पोलीस ठाण्यावर कारवाई केली. झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राऊत यांनी सांगितले की, ठाण्यावर गेल्या काही वर्षांपासून कर थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही कर भरण्यात आला नाही. त्यामुळे शनिवारी कारवाई करीत जप्तीची नोटीस लावण्यात आली. खऱ्या अर्थाने पोलीस ठाण्याची इमारत सील करायची होती. मात्र, ठाण्यात गुन्हेगांना कैदेत ठावले जाते. त्यामुळे इमारत ‘सील’करण्यात येत असल्याची नोटीस चिपकविण्यात आली. मंगळवारी, सतरंजीपुरा झोनमध्ये १० मालमत्ता जप्तमंगळवारी व सतरंजीपुरा झोननेही शनिवारी कर थकबाकीदारांवर कारवाई करीत प्रत्येकी ५ मालमत्ता जप्त केल्या. मंगळवारी झोनचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी सांगितले की, झोन अंतर्गत शिवाजी मेश्राम (१४.७९ लाख), अपरेल ट्रेनिंग डिजाइन सेंटर, भारत सरकार (११ लाख ), झिंगाबाई टाकली स्थित जय दुर्गा गृह निर्माण सहकाही संस्थेचे भूखंड (१० लाख), लता आकरे (१.२१ लाख) यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सतरंजीपुरा झोन अंतर्गत खुर्शीद हुसैन यांच्याकडे ३.१३ लाख रुपये कर थकीत आहे. श्रीकांत गोमेकर (२ लाख), गोपाल कृष्ण मंदिर (१.२१ लाख), मोतीराम खापरे (१.१३ लाख), हाजी मो. बशीर कुरैशी (१.०५ लाख) रुपयांचा कर थकीत आहे. चार घरांना सील ठोकले १८ भूखंड जप्त आशीनगर झोन अंतर्गत नारायणदास अग्रवाल (५.३३ लाख थकीत), त्रिलोचनसिंह सिद्धू (५.२७ लाख), रोहित दुबे (२.९६ लाख), अरविंद चांदेकर (७४ हजार) यांचे घर सील करण्यात आले. संबंधिथ कारवाई कर निर्धारक अतुल माटे, संजय कांबळे, महेंद्र कांबळे, सतीश बर्लेवार, सुनील मेश्राम, दीपक जांभुळकर आदींनी केली. याशिवाय मौजा वांजरा कळमना परिरातील १८ भूखंड जप्त करण्यात आले. बंधू गृह निर्माण सह संस्थेचे दोन, मधु वात्सल्य को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचे तीन, रोकडे बंधू गृह निर्माण सह संस्थेचा एक, कृष्णानंद को-आॅप हाऊसिंग सोसायटीचा एक, प्रीती को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे चार, चंद्रहास गृह निर्माण सह संस्थेचे दोन, प्रसाद गृह निर्माण संस्थेचा एक, प्रिंस गृह निर्माण संस्थेचे दोन, मो. युसूफ यांचा एक, माँ शारदा लॅण्ड डेव्हलपरचा एक भूखंड जप्त करण्यात आला. तीन दिवसात संबंधितांनी कर भरला नाही तर महापालिकेतर्फे भूखंडांचा लिलाव केला जाईल, असा इशारा झोन कार्यालयाने दिला आहे.हनुमाननगर झोनने केले ४० भूखंड जप्तहनुमाननगर झोनने शनिवारी मौजा मानेवाडा, बाबुलखेडा व सोमलवाडा अंतर्गत कारवाई करीत ४० भूखंड जप्त केले. संबंधित भूखंड धारकांकडे सुमारे ५० लाख रुपयांचा कर थकीत असून जप्त केलेल्या भूखंडांची बाजार किंमत २५ कोटींवर आहे. सात दिवसात संबंधितांनी कर भरला नाही तर भूखंडाचा लिलाव करण्याचा इशारा झोन कार्यालयाने दिला आहे. संबंधित कारवाई सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्या नेतृत्त्वाखाली कर निरीक्षक गौरीशंकर रहाटे, देवेंद्र भोवते, कंठावार, मदने, रामटेके आदींनी केली.
कर विभाग संतप्त, मालमत्ता जप्त !
By admin | Updated: February 1, 2015 00:58 IST