याचिकाकर्त्याची विनंती : हायकोर्टाने म्हटले निर्णय घ्यानागपूर : दादा, मामा, काका, भाऊ, आई, बाबा अशा नाना तऱ्हेच्या नावांमध्ये व चित्रविचित्र अवस्थेत असलेल्या नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती संबंधित याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली. याप्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली.यासंदर्भात सत्पालसिंग रेणू यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्यांमध्ये केवळ सामान्य नागरिक नाही तर, राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक राजकीय नेत्यांच्या वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट लावली असल्याचे आढळून येते. ही बाब लक्षात घेता याचिकाकर्त्याचे वकील रसपालसिंग रेणू यांनी फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. केंद्र शासनाने ‘रोड ट्रान्सपोर्ट अॅन्ड सेफ्टी बिल-२०१५’ आणले आहे. या विधेयकात फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कडक कारवाईची तरतूद करण्याचा मुद्दा यापूर्वी उपस्थित करण्यात आला होता. न्यायालयाने केंद्र शासनाच्या वकिलास यासंदर्भात माहिती घेण्यास सांगितले होते. परंतु, हा विषय पुढे सरकू शकलेला नाही. या सर्व बाबी लक्षात घेता न्यायालयाने या मुद्यावर केंद्र शासनाला निर्णय घेण्यास सांगितले आहे. मोटार वाहन कायदा-१९८८ व मोटार वाहन नियम-१९८९ अनुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध असतानाही शहरात असंख्य वाहनचालकांची ‘भाई’गिरी सुरू आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणे कोणत्याही कायद्यात बसत नाही. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. अशी वाहने समोरून गेली तरी क्रमांक वाचता येत नाही. परिणामी गुन्हेगारांचा शोध घेणे कठीण जाते. अशी हजारो वाहने नागपुरातील रस्त्यांवर धावत आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.हाय सिक्युरिटीचा नियम वाऱ्यावरकेंद्र शासनाने २८ मार्च २००१ रोजी अधिसूचना काढून हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेटस्चा नियम लागू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०११ रोजी सर्व राज्यांना या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, आजही नंबर प्लेटचा आकार, अंकांचा आकार, रंग इत्यादीसंदर्भातील नियमांचे पालन होत नाही. अनेकजण हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी किंवा अन्य प्रादेशिक भाषेत क्रमांक लिहितात. नंबर प्लेटवर लोगो किंवा चित्र चिपकविलेले असते. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटस्चा नियम वाऱ्यावर आहे.(प्रतिनिधी)
फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कडक कारवाई करा
By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST