नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या युवा अधिकाऱ्यांच्या ‘जेन नेक्स्ट टीम’ने कोळसा उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. लक्ष्यपूर्ती करताना कोल इंडिया आणि वेकोली सर्वश्रेष्ठ संस्था कशी आहे, हे जगाला सांगण्याचे आवाहन कोल इंडिया लिमिटेडचे माजी अध्यक्ष पार्थो एस. भट्टाचार्य यांनी केले.सिव्हिल लाईन्सच्या वेकोली मुख्यालय परिसराच्या सांस्कृतिक भवनात ‘व्हिजन २०२० मध्ये जेन नेक्स्ट टीमची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.वेकोलीचे अध्यक्ष सह व्यवस्थापन संचालक आर. आर. मिश्र यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भट्टाचार्य म्हणाले, नव्या पिढीच्या अधिकाऱ्यांनी कोल इंडियाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करून देशात ऊर्जेची ८० टक्के पूर्तता करणाऱ्या कोल इंडिया लिमिटेडशी निगडित असल्याचा गर्व बाळगावा. नव्या प्रकल्पाची तयारी ठेवून प्रकल्पाच्या सर्व बाबींवर लक्ष ठेवावे तसेच कामाची जबाबदारी निश्चित करावी. कोल इंडिया लिमिटेड अध्यक्षाच्या रूपाने आलेले अनुभव सांगताना त्यांनी कंपनीला नुकसानातून फायद्यात कसेआणले याची माहिती दिली. वेकोलीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मिश्र यांनी टीमला संघटित करून सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे, सीमा ठरवून लक्ष्य प्राप्त करावे, व्हिजन २०२० डाक्युमेंटमध्ये सर्व उपक्रमांचा समावेश करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, १०० मिलियन टनचे स्वप्न साकारण्यासाठी ८० टक्के लोक नव्या पिढीतील राहणार आहेत. वेकोली मुख्यालय आणि १० अधिकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी व्हिजन २०२० डॉक्युमेंट सादर केले. जेन नेक्स्ट व्हिजन २०२०च्या लोगोचे अनावरण पार्थो भट्टाचार्य यांनी केले. प्रास्ताविक वेकोलीचे संचालक रुपक दयाल यांनी केले. यावेळी संचालक एस. एस. मल्ही, महाव्यवस्थापक ए. के. सिंह, सर्व विभागाचे प्रमुख, जनसंपर्क अधिकारी आशिष तायल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लक्ष्यपूर्तीसाठी पुढाकार घ्या!
By admin | Updated: February 15, 2015 02:27 IST