नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट लवकरच प्रशासकमुक्त हाेणार. ताजबाग ट्रस्ट स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. लवकरच नवीन ट्रस्टची घाेषणा केली जाणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार साेमवारपर्यंत नवीन ट्रस्टची घाेषणा हाेण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय म्हणजे २०१६ मध्ये न्यायालयाने तत्कालीन ताजबाग ट्रस्टला बरखास्त करून सेवानिवृत्त न्यायाधीश गुणवंत कुबडे यांना ट्रस्टचा प्रशासक म्हणून नियुक्त केले हाेते. नवीन ट्रस्ट घाेषित हाेईपर्यंत ते प्रशासक राहणार आहेत. बऱ्याच काळापासून ताजबाग ट्रस्टच्या स्थापनेची प्रक्रिया प्रलंबित राहिली हाेती. आता लवकरच नवीन ट्रस्टची स्थापना हाेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताजबाग ट्रस्ट स्थापनेसाठी जिल्हा न्यायालयाच्या अधीन आवेदन स्वीकारण्यात आले हाेते. आवेदकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. याअंतर्गत ट्रस्टच्या नवीन कार्यकारिणीसाठी नऊ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र सध्या त्या सर्वांचा पाेलीस व्हेरिफिकेशनचा रिपाेर्ट येणे बाकी आहे. ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदस्यांचे पाेलीस व्हेरिफिकेशनही पूर्ण झाले आहे व साेमवारपर्यंत रिपाेर्ट येण्याची शक्यता आहे. पाेलीस व्हेरिफिकेशननुसार सर्वांचा रिपाेर्ट याेग्य राहिला तर नियमानुसार ट्रस्टची घाेषणा केली जाईल. विशेष म्हणजे, काेराेना काळात गरजवंतांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करणारे प्यारे खान यांचे नावही ट्रस्टच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या नऊ सदस्यांमधूनच एकाची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे.