नागपूर : जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत शनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना खातेवाटप केले जाणार आहे. परंपरेनुसार उपाध्यक्षांकडे बांधकाम समिती न देता भाजपकडे ही समिती ठेवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. दुसरीकडे उपाध्यक्षाकडे ही समिती कायम ठेवावी, अशी भूमिका शिवसेना सदस्यांनी घेतल्याने बांधकाम समितीवरून भाजप व शिवसेना सदस्यांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.सभेत सभापती उकेश चव्हाण, आशा गायकवाड व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांना कृषी व पशुसंवर्धन, बांधकाम, शिक्षण, अर्थ व आरोग्य अशा पाच समित्यांचे वाटप केले जाणार आहे. माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्याकडे बांधकाम व आरोग्य समितीवा पदभार होता. माजी उपाध्यक्ष नितीन राठी व तापेश्वर वैद्य यांच्याकडेही या समित्यांची जबाबदारी होती. परंपरेनुसार उपाध्यक्षांना बांधकाम व आरोग्य समितीची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी भूमिका शिवसेनेच्या सदस्यांनी घेतली आहे. परंतु सभागृहात भाजपचे सर्वाधिक २३ चे संख्याबळ आहे. शिवसेनेकडे आता जेमतेम ६ सदस्य आहे. असे असतानाही दोन समित्या देण्यात आल्या. त्यामुळे बांधकाम समिती भाजपकडेच असावी, असा पक्ष सदस्यांचा आग्रह आहे. भाजप-शिवसेनेच्या वादात विरोधी सदस्य कोणती भूमिका घेतात यावर समित्यांचे वाटप ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत केल्यास भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशावेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांना हाताशी धरून भाजपकडून खेळी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खाते वाटपासोबतच विषय समित्यांच्या रिक्त पदावर सदस्यांची निवड केली जाणार आहे. स्थायी समिती व बांधकाम समितीवर प्रत्येकी दोन, शिक्षण, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन व वित्त समितीवर प्रत्येकी एका सदस्याची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम समितीसाठी रस्सीखेच
By admin | Updated: October 18, 2014 03:01 IST