मधुमेहींनी वर्षातून एकदा ‘इको’ करावा : ‘इको नागपूर-२०१४’ परिषदेचा समारोपनागपूर : अनेक मधुमेह असणाऱ्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला तरी तो जाणवत नाही. त्यांना ‘डायबेटिक न्यूरोपॅथी’ नावाचे संक्रमण झालेले असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी किमान वर्षातून एकदा तरी ‘इको’ करून घेणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्राजक्त देशमुख यांनी दिली.नागपूर इको समीट व कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको नागपूर-२०१४’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या परिषदेचा समारोप झाला. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते.डॉ. देशमुख म्हणाले, हृदयाचा झटका येणाऱ्या बहुतांश लोकांना छातीच्या मध्यभागी अतिवेदनाकारक वेदना होतात. काहींच्या या वेदना संपूर्ण छातीत पसरतात, नंतर त्या जबड्यापर्यंत जाऊन पोहोचतात किंवा दोन्ही हातांमध्ये किंवा फक्त एका हातात पसरतात. साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध असणाऱ्या स्नायूंच्या पडद्याखाली-श्वासपटलाखाली जात नाहीत. या प्रकारच्या वेदना तीव्र असतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि अस्वस्थपणा तसेच बेचैनी जाणवते. परंतु ही लक्षणे मधुमेह असलेल्या रुग्णांना जाणवत नाही. हृदयरोगाचा झटका येऊनही कळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागते. कारण, ‘डायबेटिक न्यूरोपॅथी’मुळे दुखण्याची माहिती मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे हृदय तपासण्याचे आधुनिक यंत्र असलेले ‘इको कार्डिओग्राफी’ करून घेणे आवश्यक आहे. यात हृदयाचे कार्य सुरळीत सुरू आहे किंवा नाही, याचे निदान होते. यासोबतच अँजिओग्राफी करून हृदयाला रक्तपुरवठा खंडित झाला आहे किंवा नाही किंवा ‘ब्लॉकेज’ कुठे आहेत का, हे पाहणेही गरजेचे आहे.(प्रतिनिधी)
लक्षणे न दिसणारा हृदयरोग घातक
By admin | Updated: August 11, 2014 00:53 IST