नागपूर : मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा तसा नागपुरात कधीच इव्हेंट झाला नाही. पण यंदा मुख्यमंत्री शपथ घेत असल्याचा क्षण साठविण्यासाठी नागपूरकर उत्साही होते कारण मुख्यमंत्री म्हणून नागपूरचे लाडके नेतृत्व देवेंद्र फडणवीस शपथ घेणार होते. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव निश्चित करण्यात आले तेव्हाच नागपूर-विदर्भात जल्लोष करण्यात आला. पण अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या माणसाला पाहण्याचा क्षण नागपूरकरांनी आज आनंदाने अनुभवला. कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तर कुणी आनंदातिरेकाने घोषणांत सहभागी झाले. कुणी फटाक्यांच्या आतषबाजीने व्यक्त झाले तर कुणी घसा फुटेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या जयजयकारात रमले. शपथविधी ४ वाजतापासून होणार होता. त्यामुळे घरोघरी नागरिक ४ वाजतापासूनच टीव्हीसमोर होते. उत्साही कार्यकर्ते भाजपचा ध्वज घेऊन बाईकवर फिरत होते. अनेक लोक देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले. शपथविधीचा सोहळा सामूहिक स्वरूपात अनुभवता यावा म्हणून काही प्रमुख कार्यकर्त्यांनी बडकस चौक, महाल, लक्ष्मीभुवन चौक, धरमपेठ येथे मोठ्या स्क्रिनची सोय केली होती. त्यामुळे बडकस चौक, लक्ष्मीभुवन चौक येथे युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून मुख्यमंत्री शपथ घेत असल्याच्या सोहळ्याचे जंगी ‘सेलिब्रेशन’ केले. भाजप कार्यालयात जल्लोष धंतोली येथील भाजप कार्यालयासमोर महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला मिठाई आणि पेढे देण्यात आले. वर्धमाननगर, लक्ष्मीनगर, महाल, रामनगर आदी परिसरात काही उत्साही कार्यकर्त्यांनी घरातला टीव्ही अंगणात आणला. याप्रसंगी वस्तीतील अनेक लोक एकत्रितपणे शपथविधीचा सोहळा अनुभवत होते. मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पूर्ण होताच साऱ्यांनीच घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळला. रात्री उशिरापर्यंत हे ‘सी. एम. सेलिब्रेशन’ आनंदाला उधाण आणणारे होते. बडकस चौकात लाईव्ह देवेंद्र फडणवीस यांच्या शपधविधी सोहळ्याप्रसंगी महाल भागातील बडकस चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला. चौकात दुपारपासूनच मोठा ‘स्क्रीन’ लावण्यात आला होता अन् यावर फडणवीस यांचा शपथविधी ‘लाईव्ह’ दाखविण्यात आला. परिसरातील नागरिकांनी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. येथील व्यापारीदेखील येथे जमा झाले होते. वाहनचालकांनी यावेळी वाहने थांबवून शपथविधी बघितला. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर जोरदार आतषबाजी करण्यात आली. काहींनी नृत्याचा ताल धरीत आपला आनंद व्यक्त केला. लक्ष्मीभुवन चौकात स्क्रिन लक्ष्मीभुवन चौकात लावण्यात आलेला मोठा स्क्रिन प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर लावण्यात येणार होता. तशी तयारीही करण्यात आली पण सुरक्षेच्या कारणावरून येथे मोठा स्क्रिन लावल्यास खूप गर्दी होईल, असे कारण पोलिसांनी सांगितले. त्यामुळे फडणवीस यांच्या घरासमोर स्क्रिन लावणे शक्य झाले नाही. ऐनवेळी याची जागा बदलविण्यात आली आणि तो लक्ष्मीभुवन चौकात आणण्यात आला. शपथविधीचा सोहळा सुरू होईपर्यंत स्क्रिनवर शपथविधीचे दृश्य दिसावे म्हणून तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत होती. चार वाजेपर्यंत तांत्रिक काम पूर्ण होईल वा नाही, याची साशंकता उपस्थित गर्दीला होती पण योग्य वेळेत तांत्रिक काम पूर्ण झाल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फडणवीसांचा शपथविधी आटोपल्यावर येथे शेरोशायरीची मैफिलच जमली. सारेच मूळ शेर, शायरी जरा बदलवून फडणवीस यांचे कौतुक करणाऱ्या असल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शपथविधी सोहळा संपल्यावर फटाक्यांची आतषबाजी, पेढे आणि लाडू परस्परांना देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. शपथविधीचा सोहळा लाईव्ह मोठ्या स्क्रिनवर दिसत असल्याने रस्त्याने आवागमन करणारे अनेक लोक स्क्रिनसमोर थांबले.भारनियमनामुळे उत्साहावर विरजणशपथविधीचा सोहळा पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील लोक उत्सुक होते. पण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील लोकांनाचा हा सोहळा अनुभवता आला नाही. त्यांच्या मतदारसंघातील रामेश्वरी आणि सुदामपुरी भागातील वीज खंडित झाल्याने शेकडो नागरिकांना त्यांचा शपथविधी सोहळा अनुभवता आला नाही. याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुदामपुरी, रामेश्वरी परिसरात दुपारी २. १५ वाजतापासून वीज खंडित होती. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले. काही काळ प्रतीक्षा केल्यावर वीज येईल, असे नागरिकांना वाटले. पण ३.३०वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांनी वीज कंपनीला फोन करणे सुरू केले. शपथविधीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे नागरिकांना सांगण्यात आले पण शपथविधी संपल्यानंतरही वीज न आल्याने चारुदत्त मोडक यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पाहण्याचे कुतूहल यंदा प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागपूरचा नेता मुख्यमंत्री होत आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा क्षण अनेकांनी टीव्हीवर अनुभवला आणि प्रत्येकच नागपूरकर नागरिकाला मुख्यमंत्री नागपूरचे असल्याचा अभिमानही वाटला. शपथविधीनंतर रात्री अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह देवेंद्र फडणवीस यांचे घर पाहण्याकरिता येत होते. मोठ्या कौतुकाने ते फडणवीस यांचे घर कोणते आहे, याची विचारणा करीत होते. त्यांच्या निवासस्थानासमोरून गाडी हळू करीत मुख्यमंत्र्याचे निवासस्थान पाहत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. प्रामुख्याने अनेक नागरिक आपल्या पाल्यांच्या हट्टासाठीही फडणवीस यांचे घर पाहायला आले. मुलांनाही आपण मुख्यमंत्र्याचे घर पाहिल्याचा आनंद वाटत होता. पोलिसांचा बंदोबस्त असल्याने बरेच लोक जरा बिचकत होते. वाहने त्रिकोणी पार्कच्या बाजूला लावून दुरूनच फडणवीस यांचे घर कसे दिसते, ते बऱ्याच वेळ नागरिक कुतुहलाने न्याहाळत होते. अनेकांनी घरासमोरुन जाता येईल का? अशी विचारणाही पोलिसांना केली. पोलिसांनीही नागरिकांना सहकार्य करीत त्यांचे कुतुहल शमविले.
सामूहिक अनुभवला शपथविधी सोहळा
By admin | Updated: November 1, 2014 02:45 IST