नागपूर : पेंच पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग नागपूर येथील कार्यकारी अभियंता व्ही.पी. फुलसुंगे यांना नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप होते. गुरुवारी जलसंपदा विभागाच्या अवर सचिव एन.ए. फोंडके यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ अंतर्गत शासकीय आदेशाद्वारे त्यांना नोकरीतून निलंबित केले. पेंच पाटबंधारे व्यवस्थापन विभाग येथे उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत असतांना पेंच प्रकल्प उजवा मुख्य कालव्यावरील पुच्छ शाखा कालव्याच्या २२४० मीटरवरील राष्ट्रीय महामार्ग ओलांडणी बांधकामात झालेली अनियमितता व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते, असे आदेशात स्पष्ट केले आहे. आदेश अमलात असतील तोपर्यंत त्यांना मुख्यालय पूर्वपरवानगी शिवाय सोडता येणार नाही. या काळात त्यांना कुठला व्यवसायही करता येणार नाही. पालकमंत्री कार्यालयात व्ही.पी. फुलसुंगे यांच्या बाबतीत, गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, हे विशेष. (प्रतिनिधी)
जलसंपदा कार्यकारी अभियंता फुलसुंगे निलंबित
By admin | Updated: January 22, 2016 03:28 IST