नागपूर : ट्रान्स्फाॅर्मवर खेळता खेळता उच्चदाबाच्या तारांना चिकटलेल्या एका माकडाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रांझिट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
छत्रपती चौकातील कल्पवृक्ष हॉस्पिटलजवळ असलेल्या एका झाडावर जवळपास १५ माकडे होती. जवळच असलेल्या ट्रान्स्फाॅर्मवर काही माकडे खेळत होती. एक ७ ते ८ महिन्याचा माकड खेळता खेळता उच्चदाबाच्या विद्युत तारेला चिकटला. तेथे बघणाऱ्यांची गर्दी झाली. दरम्यान, तेथेच काम करीत असलेले उत्तम रागीट व रौनक खंडारे या युवकांनी लाकडी बांबूने त्याला खाली पाडले. खाली पडलेले माकड बेशुद्ध झाले होते. त्याला उचलण्यास गेले असता, माकडांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दोघांनी माकडाला उचलून जवळच असलेले पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. हेमंत जैन यांच्याकडे उपचारासाठी आणले. मरणासन्न अवस्थेत असलेल्या माकडावर डॉ. जैन यांनी उपचार केला. माकड शुद्धीवर आल्यानंतर त्याला वनविभागाच्या ट्रांझिट सेंटरला पाठविण्यात आले. सध्या त्या माकडावर ट्रांझिट सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.