लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सर्व यंत्रणा कोरोना संक्रमितांचे आणि मृतांचे आकडे मोजण्यात व्यस्त असतानाच शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाडी, अमरावती महामार्गावर असलेल्या वेल ट्रिट या खासगी कोरोना रुग्णालयात अग्नितांडव माजल्याचे कानी पडले आणि सगळ्याच यंत्रणा सुन्न झाल्या. भंडारा येथील प्रसूती रुग्णालयातील आग प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
वातानुकूलित यंत्राला अचानक लागलेली आग बघता बघता सर्वत्र पसरल्याने हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला होता. ही माहिती क्षणार्धात स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचली आणि सगळेच मदतीला धावले. तोवर पोलीस व अग्निशमन दलाला ही माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली होती. तोवर हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या रुग्णाला बाहेर काढण्यास सुरुवात केली. यात अनेकांना किरकोळ जखमाही झाल्या. रुग्णांना वाचविताना पेटता वातानुकूलित यंत्र हातावर पडल्याने एक डॉक्टर व कर्मचारी जखमी झाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि स्थिती नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तोवर काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या सायरनने सारा परिसर दणाणून निघाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गर्दी हटविण्यास सुरुवात केली आणि रुग्णांना मेयो, मेडिकल, सावंगी मेघे, लता मंगेशकर रुग्णालयात वळते केले. आपत्कालीन परिस्थितीत मेयो व मेडिकलमध्ये वार्ड सुसज्ज करण्यात आले होते.
............