अनेक गुन्ह्यांत सहभाग : नक्षल चळवळीला हादरागडचिरोली : माओवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी एका जहाल नक्षली दाम्पत्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आपल्या जीवनाची नवी वाट धरली.जग्गू ऊर्फ यशवंत सन्नुराम तुलावी (२३) रा. उशीरटोला ता. कोरची व रिना ऊर्फ हेमलता पंचु पुडो (२२) रा. वडगाव ता. धानोरा असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल दाम्पत्याचे नाव आहे. सदर नक्षल दाम्पत्य हे टिपागड दलमचे सदस्य होते. पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी या जहाल नक्षल दाम्पत्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला हादरा बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्या या नक्षल दाम्पत्याचा छोटा झेलिया, शिवगट्टा, कटेझरी, सिंदेसूर, कारांगरी, भुरणटोला आदी चकमकींच्या घटनांमध्ये सक्रिय सहभाग असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. २०१४ या चालू वर्षात आतापर्यंत एकूण ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यामध्ये १ डीव्हीसी सदस्य, ३ कमांडर, ६ उपकमांडर व २७ दलम सदस्यांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण
By admin | Updated: December 4, 2014 00:40 IST