नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ मार्च रोजी चिटणीस पार्क, महाल येथे नवोदित प्रतिभावंतांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होईल. हा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात हरिहरन आणि त्यांच्या सोल इंडिया बँडचे कलावंत संगीतसंध्या सादर करून ही सायंकाळ अविस्मरणीय करणार आहेत. त्यात चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम यांची उपस्थिती युवावर्गासाठी खास आकर्षण असणार आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांनी महाराष्ट्र आणि गोवा येथे सखी मंचची स्थापना करून सखी अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या अभियानात २. ५ लाखापेक्षा अधिक कुटुंब लोकमतशी जुळले आहेत. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न केले. यातून महिलांना स्वयंरोजगार आणि आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या जगण्याला एक दिशा देण्यात ज्योत्स्ना दर्डा यांचे योगदान मोठे आहे. नागपुरात जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीची स्थापना करून त्यांनी संगीताचा प्रवाह सहजपणे सखींच्या आयुष्यात आणला. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. संगीतावर असणारे त्यांचे विलक्षण प्रेम आणि त्यांची संगीत साधना लक्षात घेत त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मागील वर्षी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराला प्रारंभ करण्यात आला. या पुरस्कारासाठी संगीत क्षेत्रातील मातब्बर संगीतकार नवोदित गायकांची निवड करतात. यंदा राष्ट्रीय स्तरावर स्वत:च्या कला कौशल्याने आपली मुद्रा उमटविणाऱ्या दोन प्रतिभावंतांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपयांचा निधी पारितोषिकादाखल प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या प्रतिभावंतांची नावे कार्यक्रमात जाहीर करण्यात येतील.यंदाच्या निवड समितीत चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता सुभाष घई, पार्श्वगायक व संगीतकार शंकर महादेवन, गायक रुपकुमार राठोड, गायिका शुभा मुद्गल, शशी व्यास आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण रविवारी
By admin | Updated: March 21, 2015 02:50 IST