परतीचा पाऊस जोरात : पिकांना फायदा नागपूर : परतीच्या पावसाचा राज्यात जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भातही या पावसाने हजेरी लावली आहे.. शनिवारी रात्री उशिरापासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर धो-धो बरसला. तो रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. उपराजधानीत सायंकाळी ५.३० पर्यंत ७.९ मिमी. पावसाची नोंद झाली होती.विशेष म्हणजे, या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला फायदा होत आहे. शिवाय नागरिकांना गरमीपासून दिलासा मिळत आहे. साधारण नागपूर विभागात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ११२६.८ मिमी. पाऊस पडतो. परंतु यंदा त्या तुलनेत २५ सप्टेंबरपर्यंत केवळ ९२१.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत पावसाला तब्बल २०० मिमी. चा अनुशेष भरून काढायचा आहे. त्याचवेळी हवामान खात्याने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी झालेल्या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी भरले होते. शिवाय चौका-चौकातही पाणी साचले होते. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागला.
रविवार पाण्यात
By admin | Updated: September 26, 2016 03:06 IST