नागपूर: सायंकाळी आलेल्या वादळामुळे शहरातील काही भागात झाडे पडली. काही ठिकाणी यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. दरम्यान दिवसाचे तापमान ४२ अंश से. नोंदवण्यात आले. दिवसा कडाक्याचे उन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण व पाऊस असे मागील दोन दिवसांपासूनचे चित्र बुधवारीही कायम होते. सायंकाळी नेहमीप्रमाणे वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की दुचाकी वाहने चालविणे अवघड झाले होते. यामुळे काही ठिकाणी झाडेही कोसळली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वर्धा मार्गावर लंकेश हॉटेल जवळ झाड पडले. त्याचप्रमाणे साई मंदिराजवळ रस्त्याच्या मध्ये झाड पडल्याने एकाबाजूची वाहतूक खोळंबली होती. गजानन नगरमध्ये, मोहता सायन्स कॉलेजजवळ तसेच रघुजीनगरातील बाल हनुमान मंदिराजवळ झाड पडले. रामदासपेठेतील दगडी पार्कजवळ एक अशोकाचे झाड कारवर कोसळले. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही आल्या. दक्षिण राजस्थानात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात विदर्भासह काही भागात वातावरणातील बदलाचे परिणाम गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. बुधवारी नागपूरचे कमाल तामपान ४२ अंश से. तर किमान तापमान २४.३ अंश से. नोंदवण्यात आले. (प्रतिनिधी)
उन्हाचा चटका ; वादळाचा फटका
By admin | Updated: May 7, 2015 02:10 IST