पारा ४५. ६ अंशावर : जनजीवन प्रभावित नागपूर : दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर विदर्भातील पारा पुन्हा वर चढू लागला आहे. यात शुक्रवारी उपराजधानीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात उन्हाच्या काहिलीने अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसले. शिवाय अमरावती येथील पारा ४५.२ अंशावर पोहोचला आहे. मात्र त्याचवेळी अकोला येथील तापमान ४३.८ अंशापर्यंत खाली घसरले आहे.विशेष म्हणजे, १७ मे रोजी नागपुरातील पारा हा ४५.९ अंशावर पोहोचला होता. अकोला ४६.३ आणि वर्धा ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. परंतु मागील दोन दिवसांत विदर्भातील वातावरणात अचानक बदल होऊन, पारा खाली घसरला होता. शिवाय यामुळे उकाडासुद्धा कमी झाला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा सूर्य आग ओकू लागला. संपूर्ण विदर्भ उष्णतेच्या लाटेत होरपळून निघाला आहे. हवामान खात्याने यापूर्वीच मे महिन्याच्या शेवटपर्यंत विदर्भातील पारा हा ४७ अंशापर्यंत पोहोचण्याचे भाकीत केले आहे. शुक्रवारी नागपूरपाठोपाठ अकोला येथे ४३.८, अमरावती ४५.२, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४४.५, चंद्रपूर ४५, गोंदिया ४२.६, वाशिम ४०.६, वर्धा ४५.५ व यवतमाळ येथे ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
उन्हाची संचारबंदी !
By admin | Updated: May 21, 2016 02:50 IST