त्रिशरणनगर खामला येथील रहिवासी सुनीता सुनील लांजेवार (वय ६९) यांनी गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, सुनीता लांजेवार यांना वृद्धत्वासोबतच अनेक व्याधींचा त्रास होता. त्याला कंटाळून त्यांनी गळफास लावल्याचे समजते. महेंद्र बद्रीनाथ लांजेवार (वय ६१) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापनगर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला.
अशाच प्रकारे कपिलनगरातील भन्ते आनंद काैशल्यानगर येथे राहणारे सुनील सेवकराम रंगारी (वय ४३) याने गळफास लावून आत्महत्या केली. सुनील पेंटिंगचे काम करायचा. त्याला दारूचे भारी व्यसन होते. तो सकाळपासूनच दारू पीत होता, अशी माहिती आहे. गुरुवारी घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने दारूच्या नशेत गळफास लावून घेतला. रात्री ७.३० ला पत्नी कामावरून परतली तेव्हा तिला सुनील गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. ते पाहून ती जोरात किंचाळली आणि बेशुद्ध पडली. शेजाऱ्यांनी तिच्यावर उपचार केले. त्यानंतर राहुल बाबूराम वासनिक (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----