नागपूर : अपेक्षेपेक्षा जास्त मोर्चेकरी धडकल्यामुळे उपराजधानीत आज पुन्हा जागोजागी वाहतुकीचा खोळंबा झाला. विशेषत: शहराचे हृदयस्थान समजले जाणारे सीताबर्डी आणि आजूबाजूच्या परिसरात वारंवार चक्काजाम झाला. परिणामी आॅटो, स्कूूूलबस, अॅम्ब्युलन्स (बाहेरगावाहून आलेल्या) अडकल्या आणि त्याचा फटका विद्यार्थी आणि रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना बसला. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच बेशिस्त मोर्चेकरी आणि तोकडे पोलीस बल यामुळे उपराजधानीत वाहतुकीची पुरती वाट लागली. पहिल्या तीन दिवसात झालेल्या गैरसोयीनंतर वाहतूक पोलिसांनी चांगले नियोजन केले. त्यामुळे रविवारपर्यंत शहरातील वाहतूक सुरळीत होती. आज पुन्हा वाहतुकीची पुरती ऐसीतैसी झाली.विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस होता. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज तब्बल २० मोर्चे विधानभवनावर धडकले. सर्वच्या सर्व मोर्चांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मोर्चेकरी आले. या मोर्चेकऱ्यांनी आणि त्यांनी आणलेल्या वाहनांनी विधानभवन सभोवतालच्या परिसरातील सर्वच मार्गावर वेळोवेळी चक्का जाम झाले. खास करून सदर, व्हीसीए, एलआयसी चौक, एनआयटी चौक, विद्यापीठ परिसर, आकाशवाणी चौक, महाराजबाग, अलंकार चौक, सीताबर्डी, धंतोली, मुंजे चौक, रेल्वेस्थानक मार्ग, लोहापूल, कॉटन मार्केट रस्ता, रहाटे कॉलनी, दीक्षाभूमी परिसर, लक्ष्मीभवन चौक, सिव्हिल लाईन, धरमपेठ, एलआयसी चौक, तिकडे रेल्वेस्थानकाभोवतीचा सर्व परिसर आदीभागात वाहतुकीचा अनेकदा खोळंबा झाला. फर्लांगभर अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा-पाऊण तासाचा वेळ लागत होता. वाहतूक पोलिसांनी आजच्या मोर्चेकऱ्यांची संख्या गृहित धरून सीताबर्डी, मॉरिस टी पॉर्इंटला जोडणाऱ्या मार्गावरची वाहतूक वळवली होती. जागोजागी पोलीसही नियुक्त केले होते. मात्र, काही वाहनचालकांच्या आगाऊपणामुळे ठिकठिकाणी विशेषत: धंतोलीसारख्या भागात रुग्णवाहिका, स्कूल व्हॅन अडकल्या होत्या. रेल्वे मेन्स ते मेडिकलच्या मार्गावरही सायंकाळी ६.३० वाजता एक रुग्णवाहिका अडकल्याने आतमधील रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. ठिकठिकाणी वाहतूक रखडल्यामुळे धूर, कर्णकर्कश भोंगे यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी यांची तीव्र कुचंबणा झाली. (प्रतिनिधी)जागोजागी वाद, हाणामारीरखडलेली वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण आपले वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत होता. तशात एखादे वाहन आडवे झाल्याने दुसरे वाहन त्याच्यावर आणि त्यामागचे पुढच्या वाहनावर धडकत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी किरकोळ अपघात आणि वाहनचालकांचे वाद झाले. दुपारी २ च्या सुमारास विद्यापीठाजवळ वाहनचालकांची चक्क हाणामारी झाली. असाच प्रकार मुंजे चौकातही दुपारी ३ च्या सुमारास घडला. हॉटेल सेंटर पॉर्इंटजवळ सायंकाळी ६ च्या सुमारास मध्येच शिरून वाहतूक अडवलेल्या एका जीपचालकाला चार पाच वाहनचालकांनी कपडे फाटेपर्यंत बदडले. रोजगाराची संधी हुकली वाहतुकीच्या खोळंब्यामुळे हिंगण्यातील पाच तरुणांची रोजगाराची संधी हुकली. हर्षदीप वावरे, कुणाल राऊत आणिं अन्य तिघे कोलकाता येथे नोकरीच्या पर्सनल इंटरव्ह्यूसाठी निघाले. त्यांना १.३० वाजताची कुर्ला हावडा पकडायची होती. मात्र, रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या कस्तूरचंद पार्क, सीताबर्डी, कॉटन मार्केट अशा सर्वच बाजूने वाहतूक रखडल्यामुळे नियोजित वेळेत हे तरुण रेल्वेस्थानकावर पोहचू शकले नाही. परिणामी त्यांची रोजगाराची संधी हुकली.
उपराजधानी जाम
By admin | Updated: December 15, 2015 04:52 IST