नागपूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आर.आर. पाटील ऊर्फ ‘आबा’ यांचा अस्थिकलश गुरुवारी रात्री विमानाने पुण्यावरून नागपुरात दाखल झाला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘आर.आर. पाटील अमर रहे, ‘आबा अमर रहे’ च्या घोषणांनी आसमंत निनादला होता. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आबांचा अस्थिकलश पुण्यावरून नागपुरात आणण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अस्थिकलश येताच कार्यकर्त्यांनी ‘आर.आर. पाटील अमर रहे‘ च्या घोषणा देत अस्थिकलशाला अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, शहराध्यक्ष अजय पाटील, आ. प्रकाश गजभिये, नगरसेविका प्रगती पाटील, अतुल लोंढे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर एका रथावर अस्थिकलश ठेवण्यात आला. रथासोबत पदाधिकारी व कार्यकर्ते निघाले. अस्थिकलश असलेला रथ व्हेरायटी चौकात पोहोचला. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान चौकात रथ पोहोचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून अस्थिकलश गणेशपेठ स्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नेण्यात आला. कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९ ते ११ या वेळात अस्थिकलश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर उमरेड मार्गे अस्थिकलश गडचिरोलीसाठी रवाना होईल. येथून मार्कंडाला नेण्यात येईल आणि वैनगंगेमध्ये अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येईल. (प्रतिनिधी)
आबांचा अस्थिकलश नागपुरात दाखल
By admin | Updated: February 20, 2015 02:07 IST