लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या एका विद्यार्थ्याला तहसील पोलिसांनी जेरबंद केले. सय्यद राजिक अली सय्यद सरवत अली (वय २२) असे त्याचे नाव असून, तो जाफरनगरातील सादिकाबाद कॉलनीतील रहिवासी आहे.
उच्चभ्रू कुुटंबातील राजिक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. त्याचे वडील सदरमधील एका महाविद्यालयात प्राचार्य असून, घरची स्थिती संपन्न आहे. गुरुवारी पहाटे ४.२०च्या सुमारास तो मोमीनपुऱ्यातील एमएलए कॅन्टीनजवळून त्याच्या एमएच ३१ ईए ०१४४ क्रमांकाच्या कारने जात होता. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्याला रोखले. पोलिसांना पाहून गोंधळलेल्या राजिकने विचारपूस करताच उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता आतमध्ये कंट्री मेड पिस्तुल आढळली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. प्रारंभीक चौकशीत पिस्तुल घेऊन फिरण्याचे कारण राजिककडून स्पष्ट झाले नाही. मात्र, ही पिस्तुल त्याने काही दिवसांपूर्वी म्हाळगीनगरातील जावेद खान नामक गुन्हेगाराकडून ३० हजारांत विकत घेतल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भल्या सकाळी जावेदच्या घरी छापा घातला. मात्र, तो आढळला नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी राजिकची रिटज् कार, पिस्तुल आणि मोबाईल असा एकूण ४ लाख, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर, द्वितीय निरीक्षक बी. एस. परदेशी, उपनिरीक्षक बी. जी. राठोड, एएसआय संजय दुबे, हवालदार फुलचंद, नायक अनिल चतुर्वेदी, पुरुषोत्तम जगनाडे, रंजित बावणे, रूपेश सहारे, शिपाई माधव आणि योगेश यांनी ही कामगिरी बजावली.
----
रात्रभर कशासाठी फिरत होता ?
उच्चशिक्षीत घरातील राजिकचे असे पिस्तुल घेऊन फिरणे पोलिसांसाठी चौकशीचा विषय ठरले आहे. रात्रभर राजिक कुणासोबत आणि कशासाठी फिरत होता, ते अद्याप उघड झालेले नाही. त्याच्यामागे दुसऱ्या वाहनात त्याचे मित्र असावेत. नाकाबंदीत तो पोलिसांच्या हाती लागल्याचे बघून ते मागच्या मागे पळून गेले असावेत, असाही संशय आहे. राजिकने कुणाचा गेम करण्यासाठी ही पिस्तुल खरेदी केली का, असाही प्रश्न पोलिसांना सतावत आहे. दरम्यान, प्रारंभीक चाैकशीत त्याने दिशाभूल करणारी माहिती दिली असून, पोलिसांनी त्याचा पीसीआर मिळवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.