वस्त्या झाल्या जलमय : नाल्या, गटारी तुंबल्यानागपूर : शुक्रवारी रात्री तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे उपराजधानीची दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. रेशीमबाग, सेंट्रल एव्हेन्यू रोड परिसर, महाल, यशोधरानगर, ताजबाग, संजय गांधीनगर, न्यू नेहरूनगर, व्यंकटेशनगर, राजेंद्रनगर, पार्वतीनगर आदी वस्त्या जलमय झाल्या.यशोधरानगरातील संजीवनी कॉलनीतील खालच्या गाळ्यात पाणी शिरले. तासभर आणखी पाऊस असता तर येथील रहिवाशांना गाळे सोडून जाण्याची पाळी आली असती, असे येथील नागरिकांनी सांगितले. सध्याच्या स्थितीत कॉलनीच्या संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. मनपाच्या नेहरूनगर झोनमध्ये येणाऱ्या मानेवाडा रोडवरील संजय गांधीनगर क्र. १ मधील अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. अन्नधान्याची मोठी नासाडी झाली. संबंधित झोनमध्ये तक्रार करूनही कोणीच मदतीसाठी आले नसल्याची येथील नागरिकांनी फोनवरून माहिती दिली. मानेवाडा रोडवरील न्यू नेहरूनगर वसाहतीत ड्रेनेजची लाईन नाही. यातच ही वसाहत खोलगट भागात आहे. यामुळे पन्नासच्यावर घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या.रामेश्वरी मार्गावरील पार्वतीनगरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले. विशेष म्हणजे, मागील वसाहतीतून येणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाणारी ड्रेनेज लाईन तुंबल्याने पाणी रस्त्याने वाहत खोलगट भागातील घरांमध्ये शिरले. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. ताजबाग झोपडपट्टीतही अनेकांच्या घरात पाणी शिरले. रेशीमबाग चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड, महाल परिसरातील खोलगट भाग जलमय झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जोरदार बरसला
By admin | Updated: August 8, 2015 03:06 IST