रोहित देव : केंद्र शासनाचा हायकोर्टातील दुवानागपूर : आजच्या स्पर्धेच्या काळात वकिली व्यवसायात पाय रोवणे कुण्या मुलाबाळांचा खेळ राहिलेला नाही. बौद्धिक कणखरतेची सतत परीक्षा घेणाऱ्या या क्षेत्रात अथक परिश्रमानेच वर चढले जाऊ शकते. वकिली व्यवसायाची कोणतीही परंपरा नसलेल्यांना तर पदोपदी संघर्ष करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी ‘एएसजीआय’(अॅडिशनल सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया)पदी नियुक्ती झाल्याने अचानक चर्चेत आलेले अॅड. रोहित देव आव्हानांना तोंड देतच पुढे आले आहेत. त्यांच्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केंद्र शासनाची बाजू बळकट होणार आहे.केंद्रात सत्ताबदल होताच शासनाची कायदेविषयक बाजू सांभाळणाऱ्यांची अख्खी टीमच बदलविण्यात आली आहे. सर्वप्रथम केंद्र शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅटर्नी जनरलपदी अॅड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर सॉलिसिटर जनरलपदी रणजित कुमार यांची नियुक्ती झाली. दोघांचेही सहायक म्हणून देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये अॅडिशनल सॉलिसिटर जनरल कार्यरत असतात. अॅडिशनल सॉलिसिटर जनरल यांच्या हाताखालील पॅनलमध्येही अनेक वकील असतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेल्या काही वर्षांपासून अॅड. एस. के. मिश्रा ‘एएसजीआय’ होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. ‘एएसजीआय’पदाचे महत्त्व व जबाबदाऱ्या पाहता त्यावर संघर्षशील व्यक्तीची नियुक्ती होणे अपेक्षित होते. अॅड. रोहित देव यांच्या रूपाने या पदाला सुयोग्य व्यक्ती लाभली आहे. अॅड. देव हे मूळचे नागपूरकर असून, त्यांचे सर्व शिक्षण येथेच झाले आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एलएलबी पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केले. १९९० पासून त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. वकिली व्यवसायाची परंपरा नसलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने ते या व्यवसायाकडे आकर्षित झाले. यानंतर त्यांनी परिश्रमाच्या बळावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करून ‘एएसजीआय’पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचे मोठे बंधू शिरीष देव (डायरेक्टर जनरल आॅफ एअर आॅपरेशन्स) भारतीय वायुसेनेत कार्यरत आहेत.उच्च न्यायालयात केंद्र शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी प्रामुख्याने कोळसा, वीज, माहिती व प्रसारण आणि वैद्यकीय मंत्रालयातील प्रकरणे गाजत आहेत. अॅड. देव यांना केंद्र शासनाची बाजू सांभाळताना ताकदीने सामोरे जावे लागणार आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता ते आपल्या जबाबदाऱ्यांना न्याय देतील, यात कुणाचेही दुमत नसावे. अॅड. देव गेल्या २७ वर्षांपासून वकिली व्यवसायात असून, त्यांनी हजारावर प्रकरणे हाताळली आहेत. त्यांचा राज्य शासनाच्या ‘ए’ पॅनल वकिलांमध्ये समावेश होता. २५० महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेशबंदीच्या प्रकरणात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून विशेष वकील म्हणून काम पाहिले होते. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. ‘एएसजीआय’ म्हणून ते पुढील तीन वर्षांपर्यंत केंद्र शासनाचा उच्च न्यायालयातील सक्षम आधार असणार आहेत. (प्रतिनिधी)केंद्र शासनाची उच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी अॅड. रोहित देव यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद केंद्र सरकार आणि उच्च न्यायालय यातील महत्त्वाचा दुवा आहेत. यानिमित्त त्यांच्याविषयी आम्ही ही विशेष माहिती देत आहोत.
आव्हानांशी ताकदीने लढणारे व्यक्तिमत्त्व
By admin | Updated: July 21, 2014 00:57 IST