समितीची भूमिका संशयास्पद : कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार नागपूर : शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांतील रोष विचारात घेता रस्त्यांच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली. परंतु दोन वर्षांतील रस्त्यांची चौकशी करणार की उखडलेल्या सर्वच रस्त्यांची चौकशी करणार याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. समिती दोन वर्षांतील रस्त्यांची चौकशी करीत असल्याने इतर रस्त्यांचे काय हा प्रश्न कायम आहे. समितीच्या मर्यादा व रस्त्यांची संख्या विचारात घेता रस्त्यांची चौकशी की देखावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. समिती गठित झाल्यानंतर १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून कारवाईसाठी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार होता. आयुक्त कारवाईचा अहवाल सभागृहात सादर करणार होते. परंतु अद्याप अर्ध्या झोनची चौकशी झालेली नाही. ज्या झोनमधील रस्त्यांची पाहणी करण्यात आली, त्यात मोजक्याच रस्त्यांचा समावेश आहे. समितीमुळे डांबर घोटाळ्यातील दोषींवर कारवाई केली जाईल. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु अद्याप झोननिहाय चौकशी सुरूच आहे. चौकशी समितीच्या कामकाजाची गती व सदस्यांची उदासीनता विचारात घेता दोषी कं त्राटदारांवर कारवाई होईल, असे वाटत नाही. गेल्या दोन वर्षांत डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले आहेत. काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला झोनच्या सहायक आयुक्तांना झोनमधील रस्त्यांची चौकशी करून उखडलेल्या रस्त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु सर्व झोनमध्ये केवळ १८ रस्ते उखडल्याची माहिती पाठविली होती. झोनमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते नादुरुस्त असताना मोजक्याच रस्त्यांची माहिती पाठविल्याने या घोटाळ्यात अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याचे पुढे आले.(प्रतिनिधी)
रस्त्यांची चौकशी की देखावा?
By admin | Updated: August 17, 2016 02:16 IST