लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वारा आला. तासभर हा वारा सुरू होता. पाऊस पडला नाही, परंतु वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. सिव्हिल लाइन्स येथील मनपा आयुक्तांच्या बंगल्यासमोर ७० फूट उंच मोबाइल टाॅवर पडले. यात कुणाला इजा झाली नाही. मनपाच्या अग्निशमन पथकाद्वारे संबंधित टाॅवर हटविण्याचे काम सुरू आहे.
शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरात १२ पेक्षा अधिक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती आहे. त्यासोबतच अनेक जाहिरातींचे बोर्डसुद्धा हवेत उडून गेले. पुढील तीन दिवस याच प्रकारचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाची शक्यताही वर्तविली आहे. अग्निशमन विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार मनपा आयुक्तांच्या बंगल्याजवळ वादळी वाऱ्यामुळे मोबाइल टाॅवर पडल्याची माहिती सायंकाळी ६.४५ वाजता मिळाली. सूचना मिळताच पथक पाठवण्यात आले. टाॅवर हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. तसेच करोडपती गल्लीत झाड पडल्याचीही सूचना मिळाली. तसेच म्हाळगीनगर, सक्करदरा, शांतिनगरजवळही झाड पडल्याची माहिती आहे.
चार दिवस पावसाचे
मध्य प्रदेश व बंगालच्या आखातात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे नागपुरातील हवामान बदलले आहे. परिणामी, येत्या १४ तारखेपर्यंत नागपुरात एक किंवा दोन अंतरादरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रात्रीचे तापमान घसरले
हवामानात आलेल्या बदलामुळे नागपुरात रात्रीचे तापमान घसरले आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमान २.६ डिग्रीने खाली घसरले आहे. नागपुरात किमान तापमान २३.७ डिग्री राहिले. तर, कमाल तापमान ३९.२ डिग्री नोंदविण्यात आले.