अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ : घरांच्या भिंती कोसळल्या, छत उडालेजलालखेडा : नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा व मेंढला परिसरात गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्यातच अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या वादळामुळे नागरिकांच्या घरांच्या मातीच्या भिंती कोसळल्या असून, अनेकांच्या घरांवरील टिनपत्र्यांचे छत उडाले. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, तर झाडे उन्मळून पडल्याने भारसिंगी - लोहारीसावंगा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नरखेड तालुक्यातील खापा (घुडण), जामगाव (बु), घोगरा, जामगाव (फाटा), लोहारा, लोहारीसावंगा, रानवाडी, मायवाडी तसेच मेंढला परिसरातील मेंढला, उमठा, वडविहिरा, दातेवाडी, वाढोणा, रामठी, सिंजर, पिंपळदरा, साखरखेडा, दावसा, बानोर (चंद्र) यासह अन्य गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली. या सर्वाधिक नुकसान खापा (घुडण) येथील नागरिकांचे झाले. खापा (घुडण) येथे एकूण ३७५ घरांपैकी १९० घरांची अंशत: नुकसान झाले. यातील काही घरांच्या मातीच्या भिंती कोसळल्या असून, काही घरांवरील छत उडाले. नुकसानग्रस्तांमध्ये खापा (घुडण) येथील ज्ञानेश्वर तागडे, संभाजी वानखडे, रामचंद्र गोरे, केशव देवासे, सुभाष गोरे, सुलोचना जांभुळकर, चंद्रकला जांभुळकर, खुशालराव पाठे, अशोक शेंडे यांचा समावेश असून, या नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. वादळामुळे गावाच्या मध्यभागी असलेली झाडे कोसळल्याने परिसरातील घरांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. सोबतच मेंढला परिसरातील गावांमधील काही नागरिकांच्या मालमत्तेचे अंशत: नुकसान झाले. जलालखेडा व भारसिंगीसह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या वादळाची माहिती लगेच नागरिकांनी परिसरातील लोकप्रतिनिधी व महसूल तसेच पंचायत विभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. परंतु, रात्री उशिरापर्यंत तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधीने गावाला भेट दिली नव्हती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. (प्रतिनिधी)वीजपुरवठा खंडितवादळामुळे या गावाच्या शिवारातील विजेच्या तारा तुटल्या होत्या. दरम्यान, खापा (घडण)सह काही गावांमधील सिंगल फेजचे ट्रान्सफार्मर कोसळले होते. परिणाामी, या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. खापा परिसरातील काही गावे रात्रभर अंधारात होती. विजेच्या जिवंत तारा पडल्याने कुठेही प्राणहानी झाली नाही. वाहतूक ठप्पया वादळामुळे भारसिंगी - लोहारीसावंगा मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली होती. त्यामुळे भारसिंगीहून लोहारीसावंगा व कारंजा (घाडगे)कडे जाणारी वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. माहिती मिळताच जलालखेड्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी या मार्गाची पाहणी केली आणि कोसळलेली झाडे तोडून बाजूला करीत मार्ग मोकळा करण्यासाठी मदत केली.
१८ गावांना वादळाचा तडाखा
By admin | Updated: May 20, 2016 02:58 IST