लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : गेल्या आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. आणखी काही दिवस पावसाने उघडीप दिल्यास पिकांना जगविण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. परंतु सिंचनाची सुविधा असतानाही वीजपुरवठ्याअभावी पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. कारण महावितरणने कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवा, अन्यथा तीव्र आंदाेलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रमाेद घरडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे, हा महावितरण पर्यायाने शासनाचा तुघलकी निर्णय आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्य सरकारविराेधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रमाेद घरडे यांनी दिला आहे. एकीकडे गेल्या दीड वर्षापासून काेराेना महामारीमुळे सर्वत्र संकटांचा सामना करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांनादेखील समस्या व अडचणींना सामाेरे जावे लागले. लाॅकडाऊनदरम्यान आमदार, खासदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू हाेते. मात्र गाेरगरीब शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे. अशावेळी ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे, अन्यायकारक आहे.
सद्यस्थितीत शेतात साेयाबीन, मिरची, धानाची पऱ्हे डाेलत आहेत. पावसाने दांडी मारल्याने बहुतांश पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. शेतात माेटारपंप आहे, परंतु वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना जगविण्यासाठी शासनाने कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी घरडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात वीज कंपनीच्या मांढळ ग्रामीण कार्यालयाचे वीज अभियंता पाटील यांना विचारणा केली असता, ज्या गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे बिल थकीत आहे, तेथील विद्युत डीपीची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे वीजपुरवठा बंद राहताे. ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.