नागपूर : सलग दहा महिन्यांपासून कोरोनाशी दोन हात करत असतानाच लसीकरण सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, लस घेतल्यानंतर तयार होणारी रोगप्रतिकारकशक्ती किती काळ टिकेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एक ते दोन वर्षे प्रतिपिंडे (अँटीबॉडी) टिकू शकतात, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेल्या ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ लसींच्या लसीकरणाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात आहे. लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. त्यामुळे लसीकरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. परंतु काही प्रश्नही आहेत. लस घेतल्यानंतर अँटिबॉडी किती काळ शरीरात टिकतील, लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही का, पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर दुसरा डोस घेता येईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
साथरोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, पहिला डोस घेतल्यानंतर साधारण ५० टक्के लोकांमध्ये थोड्या अँटिबॉडी वाढतात. अँटिबॉडी वाढायला साधारण दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. परंतु दुसऱ्या डोसनंतर अँटिबॉडी तातडीने वाढतात. लसीकरणानंतर तयार झालेल्या अँटिबॉडी किती काळ टिकतील? त्यांची पातळी काय असेल? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कोरोनावरील लसीबाबत सध्या तरी तसा अंदाज बांधता येऊ शकतो की, लसीचे दोन डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी एक ते दोन वर्षे टिकू शकतात. याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो, परंतु तो गंभीर होत नाही.
- संसर्गजन्य आजार झाल्यास महिनाभर लस नाही
कोणताही संसर्गजन्य आजार झाल्यास एक महिना लस देऊ नये, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे पहिला डोस दिल्यावर कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजार झाल्यास लगेच दुसरा डोस दिला जाणार नाही. बरे झाल्यावर एक महिन्याने दुसरा डोस देता येईल. मात्र, प्रत्येक निर्णय परिस्थितीनुसार अभ्यास करून घ्यावा लागेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.