नागपूर : कोराडी विस्तारित वीज प्रकल्पातील नवव्या संचाने राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकल्प आवारात आयोजित कार्यक्रमात प्रदीपन करण्यात आले. हा संच आॅगस्ट २०१५ मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोराडी विस्तारित वीज प्रकल्पात ८, ९ आणि १० असे वीज निर्मितीचे तीन संच आहेत. यातील नवव्या संचाची वीज निर्मिती क्षमता ६६० मेगावॅट असून, या संचाचे क्रियान्वयन मे- २०१५ मध्ये होणे अपेक्षित आहे. शिवाय, संच क्रमांक-१० चे क्रियान्वयन मार्च २०१५ मध्ये होणे अपेक्षित आहे. नवव्या संचातून आॅगस्ट २०१५ मध्ये पूर्ण क्षमतेने विजेचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पातील तिन्ही संचाचे क्रियान्वयन झाल्यानंतर उपलब्ध संसाधनांचा सुजाण व सुयोग्य वापर करून महानिर्मितीतर्फे लवकरच क्षमता विस्ताराधारे विजेची मागणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कोराडी विस्तारित वीज प्रकल्पाची एकूण क्षमता १९८० मेगावॅटची आहे. या प्रकल्पातील तिन्ही संचाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या तिन्ही संचांचे टप्प्याटप्प्याने क्रियान्वयन करण्यात येणार आहे. यातील संच क्रमांक - ८ चे ११ सप्टेंबर २०१४ रोजी यशस्विरीत्या प्रदीपन करण्यात आले. सध्या स्टीम ब्लोविंगची प्रक्रिया सुरू आहे. मार्च २०१५ मध्ये या संचाचे क्रियान्वयन अपेक्षित आहे. संच क्रमांक ८ आणि ९ ची एकूण वीज उत्पादन क्षमता १३२० मेगावॅट असून, या दोन्ही संचाचे आॅगस्ट २०१५ पर्यंत करण्यासंदर्भात नियोजन करणे सुरू आहे. हा प्रकल्प सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या संचाची कार्यक्षमता अधिक असून, कोळशाचा वापर कमी केला जात असल्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळविले जाणार आहे. यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून बॉयलर व टर्बाईन उभारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रसंगी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्यासह प्रकल्पातील सर्व अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार, उपकंत्राटदार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोराडी वीज प्रकल्पातील नववा संच सुरू
By admin | Updated: January 17, 2015 02:48 IST