उमरेड : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल निश्चित करण्यात आले आहे. जागा निश्चितीनंतर या ठिकाणच्या सोयी-सुविधांबाबतचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. इकडे तातडीने कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी व्यक्त होत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढतच असल्याने दुसरीकडे सोयी-सुविधांबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती उदासीन का, असा सवालही विचारला जात आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांना विचारणा केली असता येत्या दोन ते तीन दिवसांत येथील कोविड सेंटर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी नव्याने पाइपलाइनचे काम करावे लागत आहे. शिवाय या ठिकाणी रुग्णांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये, यादृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. धरमठोक यांनी दिली. आम्ही नियमांचे पालन करतो, तुम्ही निदान प्राथमिक स्तरावर योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
दुकाने रात्री ८ पर्यंत
शनिवारी शहरातील दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. उद्या रविवारीसुद्धा बंद असून, सोमवारचा आठवडी बाजारसुद्धा पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडी बाजार भरणार नसला तरी दुकाने आणि प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत सुरू राहतील. सोमवार ते शुक्रवार हीच वेळ पुढील आदेशापर्यंत कायम राहील.
व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करावी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमरेड तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार राजू पारवे यांनी आढावा सभा घेतली. या वेळी नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, विभागातील अधिकारी आदींची उपस्थिती होती. प्रत्येक व्यावसायिक व दुकानदाराने कोरोना चाचणी करून चाचणीचा अहवाल दुकानात ठेवावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लसीकरण मोहिमेसाठीसुद्धा नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन या वेळी करण्यात आले.