तरोडी खुर्दमध्ये कारवाई : जेसीबीवर चढले नागरिक, नासुप्रच्या वाहनांचे काच फोडलेनागपूर : पूर्व नागपुरातील तरोडी खुर्द, जिजा मातानगर भागात शुक्रवारी दुपारी अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या नासुप्रच्या पथकावर नागरिकांनी जोरदार दगडफेक केली. काही लोक कारवाईसाठी आलेल्या जेसीबीवर चढले तर काहींनी वाहनांच्या काचा फोडल्या. काही लोक तर पथकातील कर्मचाऱ्यांना मारायला धावले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. सुमारे २०० महिला- पुरुषांच्या जमावाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेराव घातला. शेवटी वाढता तणाव व पोलिसांकडून पुरेशी मदत न मिळाल्याने पथकाला कारवाई न करताच परतावे लागले. नासुप्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा-तरोडी खुर्द च्या खसरा क्र. १५ वरील सुमारे सव्वाआठ एखर जमीन १९६५ मध्ये नासुप्रने अधिग्रहित केली होती. मात्र, २००१ मध्ये धापोडकर नावाच्या व्यक्तीने संबंधित जमिनीवर ले-आऊट टाकून २४३ प्लॉटची विक्री केली. यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांसह ६६ कुटुंबांनी घराचे बांधकाम केले. मात्र, जमीन नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जे लोक येथे घर बांधून राहत आहेत त्यांची घरे सोडून अन्य बांधकाम व रिकाम्या भूखंडावर असलेला कब्जा खाली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मिळालेल्या निर्देशानुसार शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास चार अधिकारी, ८ पोलीस व १६ कर्मचाऱ्यांसोबत अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पथक गेले. पथकाने सर्वप्रथम एका प्लॉटवर उभारण्यात आलेले कम्पाऊंड तोडले. कारवाई होताना पाहून लोक गोळा झाले व विरोध करू लागले. काही लोकांनी घरांमागे लपून पथकावर दगडफेक केली. पथकातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकण्यास तयार नव्हते. दुसरीकडे घामाच्या पैशातून आम्ही भूखंड खरेदी केले आहेत, असा दावा नागरिक करीत होते. दगडफेक वाढल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. मात्र, त्यानंतरही वेळेत मदत मिळाली नाहीस, अशी नाराजी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)स्थानिक नेत्याने ओतले रॉकेलपथकाला कारवाईपासून रोखण्यासाठी एका स्थानिक नेत्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची माहिती आहे. संबंधित नेता आपल्या दहा ते बारा सहकऱ्यांसह जेसीबीच्या समोर जमिनीवर झोपला. अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा इशारा दिला. या ड्रामेबाजीनंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या अंगावर पाणी ओतून आंघोळ घातल्याची माहिती आहे.
अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक
By admin | Updated: October 17, 2015 03:17 IST