नागपूर : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नागपूरच्या श्रीनाभ अग्रवाल या विद्यार्थ्याची ’इनोव्हेशन कॅटेगिरी’ अंतर्गत निवड झाली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांतर्गत दरवर्षी विविध क्षेत्रात केलेल्या संशोधनाबद्दल देशातील बाल वैज्ञानिकांचा बालशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षी ३२ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
बारावीचा विद्यार्थी असलेल्या श्रीनाभने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्याने स्वत: दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. याशिवाय ‘ट्रीपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे. ‘आयआयटी-कानपूर’चे भौतिकशास्त्राशी संबंधित दोन अभ्यासक्रमदेखील त्याने पूर्ण केले आहेत. याशिवाय कमी वयात पुस्तक लिखाणासंदर्भात ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्येदेखील त्याच्या नावाची नोंद आहे. पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी डॉ.होमी जहांगीर भाभा यांच्या पुण्यतिथीला श्रीनाभच्या निवासस्थानी जाऊन त्याचा गौरव केला.