सुमेध वाघमारे/विशाल महाकाळकर नागपूर सायंकाळ होताच उपराजधानीतील काही चौकांना मिनीबारचे स्वरूप येते. विशेषत: हुडकेश्वर रोडवरील इंगोलेनगर चौकात तर सूर्य मावळला की तळीरामांची जत्राच भरते. अंडे, चायनीज, फिशफ्राय सारख्या खाद्यपदार्थांच्या काही हातगाड्यांवर दारूच्या बाटलीसह, पाणी पाऊच व ग्लासची व्यवस्था देखील केली असते. अनेकजण या हातगाड्यांवर उभ्या-उभ्या बाटली रिचवितात तर काही चौकालगत असलेल्या रिकाम्या लॉनवर दारूच्या पार्ट्या करतात. परिणामी, चौकातून रहदारी करणारे पादचारी व महिलांची मोठी कुचंबणा होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा उघड्यावर मिनी बीअरबार सुरू आहे. जनतेच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांना हे धंदे दिसत नाही का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. ‘लोकमत’च्या चमूने या चौकाला भेट दिली असता, रस्त्याच्या कडेला असलेल्या अंडे व इतरही खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर गर्दी दिसून आली. अनेक जण जवळच्या वाईन शॉप किंवा देशी दारूच्या दुकानामधून दारूची बाटली विकत घेऊन या हातगाड्यांवर येत होते. तीन रुपयांचे पाणीपाऊच, पाच रुपयांचे एक अंड किंवा शेंगदाण्याचे पॅकेट घेऊन तिथेच बिनधास्तपणे दारू रिचवीत असल्याचे दिसून आले. हुडकेश्वर मार्गावरील बराचसा परिसर आता महानगरपालिकेच्या हद्दीत आला आहे. या भागात सिमेंट रस्तेसारख्या विकास कामांना गती आली आहे. यामुळे घरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शाळा-महाविद्यालये याच मार्गावर आहे. मात्र, इंगोलेनगर चौकातील हा मिनीबार सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या अवैध मिनीबारवर आधारित अनेक व्यवसाय फुलले आहेत. त्यावर अनेकांचे पोट भरत आहे. बिनधास्त व सहज दारू पिता येत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. मात्र, हे पाहता पोलीस प्रशासन आणि दारूबंदी विभागाने खुलेआम दारू पिण्याचा परवाना दिला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलेच्या हातगाडीवर गर्दी या चौकातील एका महिलेच्या अंड्याच्या हातगाडीवर सर्वाधिक गर्दी दिसून आली. अंधुक प्रकाशात ती महिला तीन रुपयांचे पाणी पाऊच, तेवढ्याच किंमतीचा प्लास्टिकचा ग्लास व पाच रुपयांचे एक अंडे किंवा शेंगदाण्याचे पाऊच विकत होती. विशेष म्हणजे, ते खरेदी करणाऱ्यांची झुंबड उडाली होती. काही जण तर हे साहित्य विकत घेत दारूही रिचवित होते, तर काही घोळक्या घोळक्याने दारू पिताना दिसून आले. ‘लॉन’च्या जागेचा अवैध वापर इंगोलेनगर चौकातच रिकाम्या जागेवर एका नावाचा ‘लॉन’ लिहिलेला फलक टांगलेला आहे. चारही बाजूने भिंत असलेल्या या लॉनला मात्र दरवाजा नाही. अनेक तळीराम दारूची बाटली, पाणीपाऊच व प्लास्टिकचे ग्लास घेऊन या जागेवर बसून पार्ट्या करीत होते. जणू काही त्यांच्यासाठीच ही जागा राखीव ठेवल्याचे चित्र होते. दारूच्या पार्ट्यांमध्ये काही तर अर्वाच्य भाषेत शिव्या देत होते, तर काही मोबाईलवर मोठ्या आवाजात अश्लील व्हिडिओ क्लिप्स पाहताना आढळून आले. तळीरामांमध्ये तरुणांची संख्या मोठी लोकमत चमूच्या पाहणीत या चौकातील हातठेल्यांवर मद्य पिणाऱ्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात दिसून आले. बारमध्ये बसून मदिरेचा प्याला ओठाला लावणे खिशाला परवडत नसल्यामुळे हे तरुण या चौकातील अवैध मिनीबारचा आश्रय घेत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या हातगाड्यांवर मजूरवर्गच दिसून आला नाही तर मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकही येत होते. पोलिसांना जाग येईल काय? या चौकातून दररोज रहदारी करणाऱ्या नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना हा समाजविघातक धंदा दिसतो. परंतु शहरातील पोलीस प्रशासनाला का नाही दिसत? हा जनसामान्यांचा प्रश्न आहे. पोलिसांनाही या मिनीबारवाल्यांचा हप्ता पोहचतो की, काय असे वाटावे एवढी भीषण परिस्थिती घटनास्थळावर गेल्यावर दिसून येते. या रस्त्यांनी व चौकातून जाताना कुणी दारुडा अंगावर येऊन काय करेल याचा नेम न राहिल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे.
चौक बनला मिनी बीअरबार
By admin | Updated: January 16, 2017 01:50 IST