लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या वतीने शनिवारी नागपुरात विविध भागांत रॅपिड अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आली. दिवसभरात शनिवारी २५५ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यातील १८ जण पॉझिटिव्ह निघाले. त्यांना तेथूनच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
कोरोनामुळे नागपुरातील स्थिती भयावह झाली आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित वाढल्यामुळे त्यांना सरकारी अथवा खासगी रुग्णालयात बेड मिळेनासे झाले आहेत. ऑक्सिजन, इंजेक्शन आणि इतर औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. बेड मिळावा म्हणून कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांची अक्षरशः फरपट सुरू आहे. औषधोपचार मिळेनासे झाल्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. अशाही स्थितीत अनेक बेशिस्त नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरून, गर्दी करून कोरोनाचा धोका वाढवीत आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारपासून नागपुरातील विविध भागांत चक्क रस्त्यावरच रॅपिड अँटिजन टेस्टची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरात ही मोहीम शनिवारी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आली. सीताबर्डी, सदर, अंबाझरी आणि गिट्टीखदानसह विविध भागांत सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत दिवसभरात २५५ वाहनचालकांची टेस्ट करण्यात आली. त्यात १८ जण कोरोनाबाधित आढळले. त्यांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्यांना तेथूनच सरकारी वाहनाने क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. त्यांच्या नातेवाइकांनी तसा निरोप देण्यात आला.
----
अनेकांनी काढला पळ
या मोहिमेचे व्हिडिओ आणि फोटो शहरात व्हायरल झाल्याने रिकामटेकड्यांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला. रिकामटेकड्यांनी या मोहिमेचा धसका घेतल्यामुळे दुपारी २ वाजेनंतर शहरातील अनेक मार्गांवर नेहमीसारखी वर्दळ दिसून येत नव्हती. टेस्ट सुरू असल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी मागच्या मागे पळ काढला.
---
१२९५ जणांवर कारवाई
पोलिसांनी शनिवारी स्प्रेडर्सना रोखण्यासाठी आक्रमक कारवाईचा पवित्रा घेतला. त्यानुसार, विनामास्क फिरणाऱ्या २६५, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ६१९ जणांवर कारवाई करण्यात आली. तर, कारण नसताना फिरणाऱ्या ४११ वाहनचालकांना दणका देऊन त्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली.
----