छायाचित्राच्या प्रदर्शनाचा आज समारोप नागपूर : ‘जागतिक छायाचित्र दिना’च्या निमित्ताने ‘लोकमत उमंग’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील छायाचित्राच्या प्रदर्शनाला शनिवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी नागपूरकर रसिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान रविवारी या प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण होणार आहे. रामदासपेठ लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाला प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. पिनाक दंदे, प्रसिद्ध सृजनशील छायाचित्रकार विवेक रानडे व लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक (परिचालन) अशोक जैन उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी ‘लोकमत’च्या या प्रयत्नांचे स्वागत केले. डॉ. पिनाक दंदे म्हणाले, छायाचित्रण कला आंतरबाह्य बदलली. नवे तंत्रज्ञान आले. मात्र उत्तम छायाचित्र काढण्यासाठी लागणारी कल्पकता नसेल तर छायाचित्र सजीव होत नाही. प्रदर्शनातील अनेक छायाचित्रे अशीच मनोवेधक आहेत. छायाचित्र विक्र ीच्या देणगीतून सामाजिक संस्थेच्या मदतीचा हेतू स्वागतार्ह आहे. ही कला उपजीविका चालविण्याचे साधन होत आहे, ही जमेची बाजू आहे. विवेक रानडे यांनीही सहभागी छायाचित्रांना मनापासून दाद दिली. ते म्हणाले, अशा स्पर्धा आणि प्रदर्शनातून छायाचित्रकारांचा उत्साह वाढतो. शहर आणि आजूबाजूच्या परिसराचे वैभव या छायाचित्रांमधून नजरेत भरते. या प्रदर्शनाला असलेला सामाजिक दृष्टिकोन त्याचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. दरम्यान, दिवसभर छायाचित्र रसिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन छायाचित्रकारांचा उत्साह वाढविला. रविवारी या प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले.
लोकमतच्या ‘उमंग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 31, 2014 01:14 IST