नागपूर विभाग : ४ महिन्यात २९२ कोटींचा महसूलनागपूर : जमिनीच्या बाजारमूल्यात शासनाकडून दरवर्षी वाढ केली जात असली तरी त्याचा कुठलाही परिणाम जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावर होताना दिसून येत नाही. गेल्या चार महिन्यात नागपूर विभागातील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाला दस्त नोंदणीपासून २९२.६३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.एप्रिल ते जुलै २०१४ या दरम्यान नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ६४ हजार ५३३ दस्तनोंदणीतून (कोषागार व ग्रासव्दारे) विभागाला २९२.६३ कोटींचा महसूल प्राप्त झाला . चालू वर्षासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या २६.७२ टक्के ही वसुली आहे. विभागाला चालू आर्थिक वर्षासाठी १०९५ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे सर्वाधिक म्हणजे २२७.६६ कोटी रुपयांचा महसूल नागपूर जिल्ह्यातून प्राप्त झाला असून त्यात शहराचा वाटा १८०.९५ कोटींचा तर ग्रामीणचा ४६.७१ कोटींचा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून २०.४० कोटी, वर्धा जिल्ह्यातून १९.०३ कोटी,भंडारा जिल्ह्यातून १८.७४ कोटी आणि गडचिरोली जिल्ह्यातून ६.८० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. नागपूर शहरात जमिनीचे दर गगनाला भिडले असले तरी खरेदी विक्रीचे व्यवहार तेजीत आहेत हे दस्त नोंदणीच्या संख्येवरून स्पष्ट होते. औद्योगिक शहर म्हणून नावारूपास येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याचा महसूल वसुलीत दुसरा क्रमांक आहे. (प्रतिनिधी)
खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तेजी
By admin | Updated: August 31, 2014 01:10 IST